गोव्यात आता ॲपवर टॅक्सी बुकिंग करता येणार, खासगी टॅक्सी सेवेला मान्यता | पुढारी

गोव्यात आता ॲपवर टॅक्सी बुकिंग करता येणार, खासगी टॅक्सी सेवेला मान्यता

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात ॲपवर आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यास आज गोवा विधानसभेतील सत्ताधारी व विरोधी आमदारांनी मान्यता दिली. गोवा हे जागतिक पर्यटनाचे राज्य आहे. दरवर्षी ४४ ते ४५ लाख पर्यटक गोव्यामध्ये येतात. यात देशी आणि विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. मात्र येथील टॅक्सीचालक पर्यटकांकडून अव्वाच्यासव्वा दर आकारतात. आणि त्यामुळे गोव्याची बदनामी होते. त्यासाठी गोवा सरकारने गोवा माईल्स या खासगी टॅक्सी सेवेला मान्यता दिली होती. मात्र त्या सेवलाही गोव्यातील टॅक्सीचालकांनी विरोध केला होता व जोरदार आंदोलनही केले होते.

त्यानंतर न्यायालयाने आदेश दिल्याने गोवा सरकारने डिजिटल मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र टॅक्सीचालकांनी त्याला विरोध केला. शेवटी गोवा सरकारने सुमारे ११ हजाराचे टॅक्सी मीटर प्रत्येक टॅक्सी चालकाला मोफत देण्याची योजना सुरू केली. त्यानुसार २५०० चालकांनी डिजिटल मीटर बसवलेले आहेत. मात्र ते टॅक्सीचालक प्रवासी टॅक्सीत बसल्यानंतर मिटर चालू करत नसल्याच्या तक्रारी सरकारच्या वाहतूक खात्याकडे येत होत्या. त्यानुसार वाहतूक खात्याने सुमारे दीडहजार टॅक्सी चालकांना वेळोवेळी दंडही केला आहे.

या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी आमदार डिलायला लोबो व इतर विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर बोलताना सांगितले की, राज्यातील एकूणच पर्यटकांची संख्या, गोव्याची पर्यटन राज्य म्हणून असलेली प्रतिमा आणि येथे येणाऱ्या पर्यटकांचे हित जपण्यासाठी ॲपवर आधारित टॅक्सीसेवा हाच उत्तम पर्याय आहे. त्यामुळे विरोधी आमदारांनी टॅक्सीचालकांनी या सेवेला विरोध केला तरी त्यांना पाठिंबा न देता पर्यटकांच्या हितासाठी ॲपवर आधारित टॅक्सीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. यानंतर विरोधी आमदारांनीही मुख्यमंत्र्यांच्या या आवहानाला प्रतिसाद दिला. त्यामुळे येत्या काळात गोव्यात ॲप आधारित टॅक्सीसेवा लवकरच सुरू होणार आहे.

संबंधित बातम्या

हेही वाचा:

 

Back to top button