मुंबई मनपा निवडणूक: कामाला लागा, शरद पवारांचे आवाहन; स्वत: मैदानात उतरणार | पुढारी

मुंबई मनपा निवडणूक: कामाला लागा, शरद पवारांचे आवाहन; स्वत: मैदानात उतरणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना किंवा काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही याची चिंता न करता आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात बुधवारी आयोजित केलेल्या वॉर्ड अध्यक्षांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आपण स्वत: सकाळी नऊ ते रात्री नऊ या निवडणुकीसाठी कार्यरत राहणार असून रोज एका कार्यकर्त्याच्या घरी चहा घेऊन आपण प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक सध्या तुरुंगात असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण सूत्रे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाती घेतली आहेत. निवडणूक प्रचाराचा डंका वाजताच ते अ‍ॅक्टिव्ह होणार आहेत.

यावेळी बोलताना, पवार म्हणाले, या निवडणुकीत आपल्या पक्षाला अधिकाधिक जागेवर विजय मिळू शकतो. स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी ताकद लावल्यास चित्र आणखी वेगळे दिसेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, मुंबई हे राज्याच्या राजकारणाच्यादृष्टीने महत्त्वाचे शहर आहे. या शहरात आपला पक्ष वाढविण्यासाठी सर्व कार्यकर्ते अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. आगामी निवडणूक ही आपल्यासाठी नवीन संधी असल्यामुळे आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे, अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली. मुंबई विभागीय कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी पक्षाच्या मुंबई जिल्हा व तालुकानिहाय वस्तुस्थितीचा आढावा घेत प्रत्येक वॉर्डमध्ये राजकीय परिस्थिती वेगवेगळी असल्याचे सांगितले. तसेच नवीन सहकारी एखाद्या वॉर्डमध्ये निवडणूक लढणार असेल तर त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

Back to top button