अर्थसंकल्पाचा ताळमेळ बसेना; कसा बसवावा आकडेवारीचा मेळ : संकल्प आमोणकर | पुढारी

अर्थसंकल्पाचा ताळमेळ बसेना; कसा बसवावा आकडेवारीचा मेळ : संकल्प आमोणकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचा प्रस्तावित अर्थसंकल्प, मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प, राज्यपालांनी आपल्या भाषणातून मांडलेली आकडेवारी यात ताळमेळ बसत नसल्याची टीका आमदार संकल्प आमोणकर यांनी केली. मंगळवारी अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते.

आमोणकर म्हणाले की, सरकारतर्फे दरवेळी वेगळीच आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे अनेक आमदारांचा घोळ होत आहे. त्यातील नेमकेपणा न समजल्याने अनेकांना प्रश्न विचारणे अवघड झाले आहे. सरकारने अर्थसंकल्पातील तथ्य आणि आकडेवारी योग्य प्रकारे मांडली पाहिजे. ते म्हणाले, सरकारने मुरगाव तालुक्याला नेहमीच फसविले आहे. येथे एमपीटी, जेएसडब्ल्यू, वेदांता सारख्या मोठ्या कंपन्या आहेत. मात्र याचा स्थानिकांना कोणताही फायदा होत नाही. बहुतेक ठिकानी स्थानिक उमेदवारांना नाकारून राज्याबाहेरील लोकांना नोकरी दिली जाते. या कंपन्या कोळसा हाताळतात मात्र त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दिवसेंदिवस तालुक्यातील अस्थमाचे रुग्ण वाढतच आहेत. अशा कंपन्यांनी स्थानिकांना नोकरी, आरोग्य सेवा व अन्य सोयी सुविधा पुरविणे आवश्यक आहे. अन्य ठिकाणी असे केले जाते मात्र गोव्यामध्ये कंपन्या दादागिरी करत स्थानिकांचा हक्क हिरावून घेत आहेत.

Back to top button