भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ( ENGvsIND Day 2 ) इंग्लंडचा कर्णधार जो रुटने ( १२१ ) दमदार शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावार इंग्लंडने पहिल्या डावात ८ बाद ४२३ धावा केल्या. त्याला डेव्हिड मलानने ७० धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. चहापानानंतर भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन केले. मात्र त्यांना इंग्लंडचा डाव संपवता आला नाही. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी इंग्लंडने १२९ षटकात ८ बाद ४२३ धावा केल्या होत्या. त्यांनी पहिल्या डावात ३४५ धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून शमीने ३ तर सिराज आणि जडेजाने प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात मोहम्मद शमीने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने ६१ धावांवर खेळणाऱ्या रोरी बर्न्सचा त्रिफळा उडवत १३५ धावांची सलामी देणारी जोडी फोडली.
बर्न्स बाद झाल्यानंतर आलेल्या डेव्हिड मलान खेळपट्टीवर आला. त्याने सलामीवीर हासीब हमीदच्या साथीने इंग्लंडला १५० च्या पार पोहचवले. मात्र त्यानंतर रविंद्र जडेजाने सेट झालेल्या हमीदचा ६८ धावांवर त्रिफळा उडवत इंग्लंडला दुसरा आणि मोठा धक्का दिला.
हमीद बाद झाल्यानंतर आलेल्या जो रुटने मलानच्या साथीने इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी लंचपर्यंत इंग्लंडला १८२ धावांपर्यंत पोहचवले. रुटने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडकडे १०४ धावांची आघाडी होती.
लंचनंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुटने आपला आक्रमक बाणा कायम राखत इंग्लंडला २०० चा टप्पा पार करुन दिला. दुसऱ्या बाजूने मलान सावध फलंदाजी करत आपल्या कर्णधाराला चांगली साथ देत होता.
दरम्यान, जो रुटने आपले आक्रमक अर्धशतक ५७ चेंडूत पूर्ण केले. त्या पाठोपाठ डेव्हिड मलाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत पहिल्या डावातील आघाडी २०० च्या जवळ पोहचवली.
ही जोडी भारताची चांगलीच डोकेदुखी ठरली होती. मात्र अखेर चहापानापूर्वी मोहम्मद सिराजने ७० धावा करणाऱ्या मलानला बाद करत भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने रुट आणि मलानची तिसऱ्या विकेटसाठी केलेली १३९ धावांची भागीदारी तोडली.
चहापानानंतर रुटने जोन बेअरस्टोच्या साथीने इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा पार करुन दिला. दरम्यान, रुट आपल्या शतकाजवळ पोहचला होता. त्याने १२४ चेंडूत आपले कारकिर्दितील २३ वे शतक ठोकले.
मात्र चहापानांतर मोहम्मद शमीने प्रभावी मारा करण्यास सुरुवात केली. त्याने पहिल्यांदा २९ धावा करुन रुटला चांगली साथ देणाऱ्या बेअरस्टोला बाद केले. त्यानंतर आलेल्या धोकादायक जोस बटलरला ७ धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने दोन विकेट घेतल्याने इंग्लंडचा निम्मा संघ माघारी गेला.
त्यानंतर विकेटसाठी प्रतिक्षा करत असलेल्या बुमराहने रुटची शतकी ( १२१ ) खेळी संपवली. रुट बाद झाल्यानंतर जडेजाने मोईन अलीला ८ धावांवर बाद करत इंग्लंडला सातवा धक्का दिला.
मोईन अली बाद झाल्यानंतर सॅम करन आणि क्रेग ओव्हरटनने इंग्लंडला ४०० धावांचा टप्पा पार करुन दिला. इंग्लंडची ही शेपूट भारताला पुन्हा जड जाणार असे वाटत असतानाच सिराजने करनला १५ धावांवर बाद करत इंग्लंडला आठवा धक्का दिला. त्यानंतर मात्र ओव्हरटर्न आणि रॉबिन्सन यांनी डाव सावरत इंग्लंडला दिवस अखेर ४२३ धावांपर्यंत पोहचवले.