गोवा : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत | पुढारी

गोवा : शिकारीच्या नादात बिबट्या पडला विहिरीत

डिचोली (गोवा) : पुढारी वृत्तसेवा
कुडणे गावातील भिणवाड्यावरील शेळ येथे वासराची शिकार करण्यासाठी आलेला बिबट्या विहिरीत पडला. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. शनिवारी सकाळी केरी येथील वन अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले.

बिबट्याने शेळ-कुडणे येथील प्रेमानंद राणे यांच्या घराशेजारील गोठ्यात असलेल्या वासरावर हल्ला केला. या ठिकाणी दोनच घरे असून राणे यांच्या घरामागील गोठ्यात गाय व वासरू होते. शुक्रवारी रात्री बिबट्या वासराची शिकार करण्यासाठी आला. त्याने वासरावर झडप घातली. यात वासरू जखमी झाले. त्यावेळी गाय धावून आल्याने पळ काढण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज वन अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला. दरम्यान, सकाळी हा प्रकार उघकीस आला.

याबाबत माहिती मिळताच वन खात्याचे विभागीय अधिकारी विवेक गावकर आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विवेक यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडू राणे, राज माजीक, विशाल नाईक, अर्जुन राणे, शामू वरक, शेखर गावस आदींनी बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढत जेरबंद केले. केरी येथे रवानगी केली. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सदर बिबट्या पुर्ण वाढ झालेला असल्याचे विवेक गावकर यांनी सांगितले.बिबट्याने वासरावर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात आले. बिबट्या विहिरीत पडल्याचे समजताच लोकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचलत का ?

Back to top button