World Homeopathy Day : ‘ होमिओपॅथी ‘ शरीराला कुठलीही बाधा न पोहोचविणारा उपचार | पुढारी

World Homeopathy Day : ' होमिओपॅथी ' शरीराला कुठलीही बाधा न पोहोचविणारा उपचार

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर
होमिओपॅथी उपचार सध्याच्या काळात बरेच लोकप्रिय झाले आहेत. पूर्वी होमिओपॅथी उपचारानंतर रुग्ण बरे होण्यास जास्त दिवस लागतात, असा समज होता. मात्र, आता इतर वैद्यकीय उपचाराइतक्याच दिवसात होमिओपॅथी उपचाराद्वारे रुग्ण बरे होत आहेत. होमिओपॅथी उपचार शरीराला कुठलीही बाधा पोचवत नाहीत, त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाहीत. या उपचाराची औषधे स्वस्त असल्यामुळे होमिओपॅथी उपचाराला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती शहरी आरोेग्य केंद्र मडगाव येथे आयुष डॉक्टर म्हणून सेवा बजावणार्‍या डॉ. प्रतिष्ठा कुंकळ्येकर यांनी दिली आहे.

10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा होतो. त्या अनुषंगाने होमिओपॅथी डॉक्टर म्हणून कोरोना काळात चांगली कामगिरी बजावलेल्या डॉ. कुंकळ्येकर यांच्याशी राज्यातील होमिओपॅथी उपचार पद्धतीबाबत चर्चा केली असता त्यांनी वरील माहिती दिली. गोव्यात शिरोडा येथील श्री कामाक्षीदेवी होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात होमिओपॅथी पदवीचे शिक्षण उपलब्ध आहे. साडेपाच वर्षांच्या शिक्षणानंतर पदवी मिळते. मंत्री सुभाष शिरोडकर यांची ही संस्था आहे. होमिओपॅथी पदवी घेतल्यानंतर स्वतः खासगी क्‍लीनकद्वारे सराव करता येतो किंवा सरकारी इस्पितळात नोकरी करता येते. आता आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी डॉक्टरांना आपल्या इस्पितळात सामावून घेतले आहे. कारण आयुष आणि होमिओपॅथी सलग्न आहेत, असे डॉ. कुंकळ्येकर यांनी सांगितले.

होमिओपॅथी औषधे लाभदायक व स्वस्त

मानसिक आजार, सांंधेदुखी व इतर अंग दुखीचे आजार, गुंतागुंतीचे आजार विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व मुलांचे आजार यावर इतर उपचारांपेक्षा होमिओपॅथी उपचार उपयुक्त ठरतात . पेनकिलर सारखी औषधे घातक ठरतात. तर होमिओपॅथी औषधांचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. ती गोड असल्याने मुले आनंदाने घेतात. तसेच होमिओपॅथी औषधे इतर औषधांपेक्षा स्वस्त आहेत. पूर्वी जर्मनीतून होमिओपॅथी औषधे येत. आता जर्मनीतील कंपन्यांनी भारतात औषधे निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे औषधे कमी दरात उपलब्ध होत आहेत. गोव्यात दोन वितरकांकडे औषधे उपलब्ध आहेत.

300 च्या आसपास खासगी डॉक्टर

राज्यात 300 च्या आसपास होमिओपॅथी डॉक्टर खासगी सराव करत आहेत. गोवा बोर्ड ऑफ होमिओपॅथी ही संस्था त्यांची नोंंद ठेवते. आपण त्या संस्थेची सदस्य आहे. 12 वी नंतर नीट परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर होमिओपॅथी महाविद्यालयात प्रवेश मिळतो, असे त्या म्हणाल्या. शिरोडा होमिओपॅथी महाविद्यालयातून गेल्या तीन वर्षांत 1200 च्या आसपास विद्यार्थ्यांनी पदवी घेतली आहे. डॉक्टरच्या पुढे फिजीशियनपर्यंत शिकता येते, असेही डॉ. कुंकळ्येकर यांनी नमूद केले.

Back to top button