गोवा : मडगाव येथे जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी गेले वाया | पुढारी

गोवा : मडगाव येथे जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी गेले वाया

मडगाव: पुढारी वृत्तसेवा : मडगावच्या पावर हाऊस जंक्शनवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम सुरु असताना जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. जलवाहिनी बंद करण्याची सुचना देऊन कामगारांना दुरुस्ती काम करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण जलवाहिनी कापताच मोठ्या प्रमाणात पाण्याचे कारंजे वर उडू लागले. या घटनेमुळे मडगावच्या स्टेशनरोड परिसरात आठ तासांसाठी पाणीपुरवठा खंडीत झाला आहे.

सदर घटना शुक्रवारी (दि. ८) रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान घडली आहे. स्टेशन रोड परिसरात पाणी पुरवठा होणार नाही याची कोणतीही कल्पना खात्याने दिली नव्हती. अचानक पाणी गेल्यामुळे ऐन गर्मीत लोकांचे बरेच हाल झाले आहेत. संबंधित विभागाचे ज्येष्ठ अभियंते साखरदांडे यांच्यांशी संपर्क साधला असता रात्री आठपर्यंत पाणी पुरवठा सुरळित होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

सविस्तर माहितीनुसार सकाळी कामगारांना व्हॉल्व्ह बदलण्याचे काम सोपविण्यात आले होते. चालू स्थितीत असलेल्या वाहिनीवर काम करायचे असल्याने सदर वहिनी काही वेळासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर कामगारांना जलवाहिनी बंद करण्यात आल्याची सूचना मिळाल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली होती. यावेळी लोखंडी वाहिनी कापण्यासाठी गॅस कटरचा उपयोग करण्यात आला होता. पण वाहिनीला तडा जाताच पाण्याचे फवारे सुमारे दहा मीटर पर्यत वर उडू लागले. साधारणपणे दीड तास पाणी वाहून गेल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर या भागातून जात असताना त्यांच्या नजरेत हा प्रकार पडल्याने त्यांनी ताबोडतोब घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने पाणी बंद करण्याच्या सूचना दिल्या. तुयेकर यांच्या सुचनेनंतर दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. रात्री आठ वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button