सर्वधर्म समभाव! गोव्यातील गणेशपुरी विश्वस्त मंडळात पहिल्यादांच एक महिला आणि मुस्लिम व्यक्तीला प्रतिनिधीत्व | पुढारी

सर्वधर्म समभाव! गोव्यातील गणेशपुरी विश्वस्त मंडळात पहिल्यादांच एक महिला आणि मुस्लिम व्यक्तीला प्रतिनिधीत्व

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा : उत्तर गोव्यातील म्हापसा मतदारसंघातील गणेशपुरी येथील श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळाने सर्वधर्म समभावचा संदेश दिला आहे. या समितीने आपल्या कार्यकारिणीत पहिल्यादांच महिला व एका मुस्लिम धर्मातील व्यक्तीला प्रतिनिधीत्व देऊन गोव्यासह देशातील इतर देवस्थान व धार्मिक संघटनांमसोर मोठा आदर्श ठेवला आहे. या विश्वस्त मंडळाने उषा हरमलकर व सलीम इसानी यांची या कार्यकारिणीत निवड केली आहे.

यासंदर्भात बोलताना सलीम इसानी यांनी सांगितले की, सर्वच देव हे सारखेच असतात. सर्व धर्मांनी एकजुटीने व एकसंघ रहावे, अशी आमची मनोभावना आहे. या हेतूनेच आम्ही सामाजिक कार्य करत असतो. समाजकार्य आणि चांगल्या गोष्टींना सहकार्य करणे, ही माझी आवड आहे. त्यामुळे अनेक सामाजिक व धार्मिक संस्थांमध्ये सहभागी होतो. गणेशपुरी विश्वस्त मंडळ समितीवर माझी निवड झाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो.

याविषयी नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यवान भिवशेट यांनी सांगितले की, गणेश मंदिराच्या उभारणीत गणेशपुरी व म्हापसासोबतच संपूर्ण गोव्यातील महिलांनी पुरुषांसह हातभार लावला आहे. तसेच गणेशपुरीमध्ये महिला वर्गाला मोठा आदरभाव दिला जातो. महिलांचेही देवस्थानविषयी काही अभिप्राय असतात. ते विश्वस्त मंडळ समिती समोर यावेत, आणि मंडळ समितीमध्ये एका महिला प्रतिनिधीचा समावेश असावा, अशी इच्छा विश्वस्त मंडळाने व्यक्त केली. त्यानुसार, या कार्यकारिणीत उषा हरमलकर यांना स्थान देण्यात आले.

तर सलीम इसानी हे विश्वस्त आहेत. मंदिराच्या सर्व कार्यात व धार्मिक उत्सवात ते हिरिरीने सहभाग घेतात. ते विश्वस्त असल्याने त्यांनाही समितीमध्ये संधी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे विश्वस्त मंडळाने इसानी यांनाही समितीत स्थान देण्याचा निर्णय घेत त्यांची निवड झाल्याचे भिवशेट म्हणाले.

गणेशपुरी-म्हापसा येथील श्री गणेशपुरी विश्वस्त मंडळ कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सत्यवान भिवशेट यांची बिनविरोध निवड झाली आहे. वर्ष २०२२ ते २०२५ या कार्यकाळासाठी निवडलेल्या या कार्यकारिणीचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष प्रमोद कळंगूटकर, सचिव अ‍ॅड. पांडुरंग बाणावलीकर, उपसचिव गोकुळदास नागवेकर, खजिनदार विश्वास पिळर्णकर, उपखजिनदार रामकृष्ण नावेलकर, सदस्य व्यंकटेश प्रभू, अर्विशा ऊर्फ उषा हरमलकर, सलीम इसानी, मयूर सावकर व यशवंत गवंडळकर.

हेही वाचा

Back to top button