रत्नागिरी : दापोलीच्या तरुणाचा लघुनिबंध दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात | पुढारी

रत्नागिरी : दापोलीच्या तरुणाचा लघुनिबंध दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात

दापोली; प्रवीण शिंदे : दापोली तालुक्यातील पीसई येथील 33 वर्षीय नीलेश उजाळ यांच्या लघुनिबंधाचा समावेश दिल्ली बोर्डाच्या (सी.बी.एस.ई.) अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. इयत्ता सातवीच्या मराठी पुस्तकात ‘सुसंगती सदा घडो’ या शीर्षकाचा हा पाठ आहे. नीलेशच्या या कार्याने दापोली तालुक्याची शान वाढली आहे.

नीलेश यांची इच्छा होती की, आपली एखादी कविता महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात यावी; पण यात त्यांना यश आले नाही. किंबहुना यात आपले प्रयत्न कमी पडत आहेत, असे त्यांना वाटत असे. मात्र, अचानक दिल्ली बोर्डाच्या अभ्यासक्रमात ‘सुसंगती सदा घडो’ हा धडा घेण्यात आल्याने महाराष्ट्र बोर्डाची उणीव दिल्ली बोर्डाने भरून काढली, अशी भावना नीलेश उजाळ यांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

नीलेश यांना इयत्ता चौथीपासून लिखाणाची आवड आहे. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई संगीता आणि ग्रामस्थ यांनी नीलेशचे मनोधैर्य वाढविले. दापोली तालुक्यातील पिसई काटकरवाडी हा ग्रामीण भाग असूनही नीलेशसारख्या युवकाची ही भरारी प्रेरणादायी आहे. नीलेश यांचे शिक्षण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत झाले. ते सध्या एका वेबसाईटसाठी लेखन करीत आहेत.

शीर्षक गीतांसह बालकविता संग्रह लोकप्रिय

नीलेश उजाळ यांनी ‘नकळत सारे घडले’ आणि ‘ललित 205’ या मालिकांसाठी शीर्षक गीत लिहिले आहे. ‘सोन्याची पावलं’ यासाठी शीर्षक गीत लिहिले आहे. हळदीच गाणेदेखील लिहिले आहे. ‘सुरंगी फुले’ हा बालकविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

दिल्ली बोर्डाने घेतलेली दखल हे सारं शब्दांचं श्रेय आहे. परिस्थितीच्या वादळात संयमाने चालत असताना अनुभवाच्या वाटा सापडत गेल्या. आव्हाने पेलत गेलो. त्यामुळे आज मी इथवर पोहोचलोय.
– नीलेश उजाळ

Back to top button