गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अटीतटीच्या लढतीत विजयी | पुढारी

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अटीतटीच्या लढतीत विजयी

पणजी; पुढारी वृत्तसेवा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघातून ६७८ मतांनी विजयी झाले आहेत. साखळीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार धर्मेश सगलानी यांचा पराभव केला आहे. वाळपईतून मतदारसंघातून विश्वजित राणे विजयी झाले आहेत. दरम्यान, केपे मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर पराभवाच्या छायेत आहेत.

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ आहे. भाजपने १९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा ३ जागांवर तर आम आदमी पक्षाचा २ जागांवर विजय निश्चित आहे. सध्याच्या कलानुसार गोवा फॉरवर्डला १ जागेवर आणि आरजेपीला १ जागेवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना विजयाने हुलकावणी दिली. येथे भाजपचे बाबूश मोन्सेरात ६५३१ मते घेत विजयी झाले आहेत. उत्पल यांना ५८५७ मते मिळाली असून, येथे चुरशीची लढत झाली. उत्पल पर्रीकर यांना मात्र अवघ्या ६७४ मतांनी पराजय स्वीकारावा लागला आहे.

सकाळी पोस्टल मतदानात उत्पल आघाडीवर होते. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीतही ते काही काळ आघाडीवर होते. शेवटच्या फेर्‍यांमध्ये बाबूश यांनी आघाडी घेतली. बाबूश यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला. उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, पणजीला लागून असलेल्या ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात विजयी झाल्या आहेत.

तिसऱ्यांदा भाजपच्या हाती सत्ता?

गोवा विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळण्याचे संकेत मिळत आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाने १९ जागांवर आघाडी मिळवली होती. तर काँग्रेस पक्षाने १२ जागांवर आघाडी मिळवली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि त्यांच्या पत्नी डॉ. दिव्या राणे तसेच पणजीचे भाजप आमदार बाबूश मोन्सेरात यांनी विजय मिळवलेला आहे. तर पणजी मतदारसंघात माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र अपक्ष उमेदवार उत्पल पर्रीकर यांना पराभूत व्हावे लागले आहे.

उत्तर गोव्यातील २० मतदार संघाची मतमोजणी आल्तिनो येथील सरकारी पॉलिटेक्निक इमारतीमध्ये सुरु झाली. मतमोजणीच्या ठिकाणी उत्तर गोव्यातील विविध पक्षाचे हजारो समर्थक मतमोजणीच्या ठिकाणी आले होते. सुरुवातीपासून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळवणे सुरू केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे झेंडे बाहेर दिसत होते. त्याचबरोबर कार्यकर्ते भाजपाच्या घोषणा करीत होते.

सांताक्रूज ,कळंगुट या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याचे कळतात काँग्रेसचे झेंडे या ठिकाणी दिसू लागले. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेल्या आरजी पक्षाचे सांत आंद्रे येथील युवा उमेदवार वीरेश बोरकर यांनी विजय मिळवला.

Back to top button