पणजी : पिनाक कल्लोळी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाने प्रथमच 100 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करताना अत्याधुनिक 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता ) तंत्रज्ञानाचा वापर केला. वेबकास्टिंगमुळे निवडणूक आयोगाला पणजीमध्ये बसून केंद्रावरील घडामोडींचे थेट प्रक्षेपण पाहता आले. 'एआय'मुळे त्या केंद्रावर ये-जा करणार्या आणि उपस्थित लोकांची एकूण संख्याही समजून घेता आली.
वेबकास्टिंग तंत्रज्ञानाचा वापर 2017 मध्येही झाला होता. त्यावेळी मतदान केंद्रावर उपस्थितांची संख्या जाणून घेण्यासाठी विशेष व्यक्तीची नेमणूक केली होती. मात्र यावेळी 'एआय' कॉम्प्युटर प्रोग्रॅम वापरण्यात आला. यामुळे थेट व्हिडीओ फुटेज दाखविणार्या स्क्रीनवरच केंद्रावरील लोकांची संख्या पाहता आली. पूर्वीप्रमाणे संख्या जाणून घेण्यासाठी वेगळ्या व्यक्तीची गरज पडली नाही.
संवेदनशील मतदान केंद्रावर थेट नजर ठेवण्यासाठी आयआयटी गोवाचे प्राध्यापक शरद सिन्हा यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत मिळून 'इलेक्शन आय' हा कॉम्प्युटर प्रोग्राम तयार केला आहे. यामध्ये कॉम्प्युटरला व्हिडीओमध्ये दिसणार्या माणसांची ओळख करता येते. तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून त्वरित निष्कर्षही काढता येतो. यामुळे एखाद्या मतदान केंद्रावर अनावश्यक गर्दी होत असल्यास आयोगाला त्याची थेट माहिती मिळते.
मुख्य मतदान अधिकारी कुणाल यांनी सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत आयोगाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकधिक वापर केला आहे. यावेळी प्रथमच 'एआय' तंत्रज्ञान वापरून केलेले वेबकास्टिंग चांगलेच यशस्वी ठरले आहे. यामुळे मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगळ्या मनुष्यबळाची गरज उरली नाही.आम्ही मुख्य निवडणूक आयोगाला येणार्या सर्व निवडणुकात या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस करणार आहोत. याशिवाय 'वोेटर दोस्त' या टेलिग्राम चॅनललाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचलत का?