१० कोटी १३ लाखांची संपत्ती जप्त; आचारसंहिता भंगाच्या ३९८ तक्रारी दाखल

१० कोटी १३ लाखांची संपत्ती जप्त; आचारसंहिता भंगाच्या ३९८ तक्रारी दाखल
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मतदारांना आमिषे दाखवण्यासाठी आणलेली १० कोटी १३ लाख रुपयांची मालमत्ता (पैसे व वस्तू) निवडणूक यंत्रणेने आजवर जप्त केली आहे. आचारसंहिता भंगाच्या ३९८ तक्रारी आल्या त्यापैकी २५३ तक्रारीं तथ्य आढळले. आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी ३८ गुन्‍हे दाखल केले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्य मतदार अधिकारी कुणाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 कुणाल म्हणाले, विविध यंत्रणांनी मिळून बेहिशोबी असे ६ कोटी ३० लाख रुपये जप्त केले आहेत. २ कोटी ४४ लाख रुपयांची बेकायदा साठवून ठेवलेली दारू, १ कोटी ६ लाख रुपयांचे अमली पदार्थ, २४ लाख रुपयांच्या मौल्यवान धातूच्या वस्तू आणि ९ लाख रुपयांच्या मोफत वाटण्यासाठी आणलेल्या वस्तू जप्त केल्या आहेत. नागरीकांनी मोबाईलवर सी व्हिजील ॲप वापरणे सुरु केले आहे. आजवर त्या माध्यमातून ३९८ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या तक्रारींची सत्यता पडताळून पाहण्यात आल्यानंतर २५३ तक्रारींत तथ्य आढळले आहे. अजूनही आचारसंहिता भंग आढळल्यास जागृत नागरिकांनी सी व्हिजील ॲपच्या माध्यमातून तक्रारी कराव्यात, असे आवाहनही त्‍यांनी केले.

 १ हजार ७२२ मतदान केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा निर्माण कऱण्याचे काम पूर्ण होत आले आहे. दिव्यांगांसाठी २५० ठिकाणी तात्पुरते रॅम्प उभारण्यात आले आहेत. १८८ ठिकाणी तात्पुरती स्वच्छतागृहे तर ४८ ठिकाणी पाण्याचे तात्पुरते जोड जोडण्यात आले आहेत. ५ मतदान केंद्रांना तात्पुरता वीज पुरवठा घेण्यात आला आहे. प्रत्येक मतदार केंद्रावर सरासरी ६७६ मतदार असल्याने मतदानासाठी गर्दी होणार नाही. याशिवाय सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान होणार असल्याने मतदानासाठी एक जादा तास मिळत आहे. राज्याबाहेरून कोणी महत्त्‍वाचा नेता प्रचारासाठी आला तर त्याच्या प्रचाराचा खर्च उमेदवार व पक्षाच्या खर्चात समाविष्ट केला जाणार आहे, असेही ते म्‍हणाले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार आता मोकळ्या जागेत १ हजारांच्या उपस्थितीत सभा घेता येईल. सभागृहात क्षमतेच्या पन्नास टक्के किंवा ५०० जणांच्या उपस्थितीत सभा घेता येईल. दारोदार प्रचारासाठी फिरताना सुरक्षा कर्मचारी वगळता २० जणांना सोबत नेता येईल. सभा बैठका घेण्यासाठी राज्यभरात ४९० ठिकाणे निश्चित केली आहेत. यात वाढ करावी का याची विचारणा राजकीय पक्षांकडे कऱण्यात आली आहे. ५ जानेवारी रोजी मतदार यादीत कोणताही बदल करणे बंद केल्याचे त्यांनी नमूद केले.

येत्या १४ रोजी मतदान हाेणार आहे. ११ लाख ६४ हजार मतदार पात्र ठरले आहेत. गेल्या महिनाभरात ९ हजार ३६१ नवे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्‍ये ९ हजार ५९० दिव्यांगतर २९ हजार ७९७ मतदार हे ८० वर्षांवरील आहेत. या मतदारांना घरबसल्या मतदान करण्यासाठी १२ ड अर्ज भरून द्यायचा होता. त्यापैकी केवळ १३ हजार २८४ जणांनी हा अर्ज वेळेत भरुन दिला आहे. त्यांच्या घरी निवडणूक यंत्रणेचे खास पथक जाऊन छापील मतपत्रिकेच्या आधारे मतदान करवून घेणार आहे.यासाठी शंभर कर्मचाऱ्यांची खास पथके तयार केली आहेत. मंगळवारपासून हे मतदान घेण्याची प्रक्रिया सुरु होईल. सेवेत असलेले २९८ जण टपालाने मतदान करणार आहेत. त्यांनाही इलेक्ट्रॉनिक्सच्या पद्धतीने मतपत्रिका पाठवली जाणार असल्‍याचेही कुणाल यांनी सांगितले.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news