गोव्यात स्टार प्रचारकांची मांदियाळी | पुढारी

गोव्यात स्टार प्रचारकांची मांदियाळी

पणजी : विलास ओहाळ

विधानसभा निवडणुकीचे मतदान पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. अर्जांची छाननी पार पडली असल्याने लढतींचे चित्रही स्पष्ट झाले आहे. उमेदवारांचा प्रचाराचा धडाका सुरू झाला आहेच; पण त्याच्या जोडीला विविध पक्षांचे स्टार प्रचारकही प्रचारासाठी गोव्यात दाखल होत आहेत.साहजिकच राजकीय वातावरण तापले आहे.

राज्याच्या निवडणूक रिंगणात मुख्यत्वे भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस हे राष्ट्रीय स्तरावरील पक्ष रिंगणात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपली सत्ता आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रचार सभांवर बंधने आल्याने घरोघरी प्रचार महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबर इतर कार्यकर्त्यांची फौज भाजप, काँग्रेस व तृणमूल काँग्रेसने कामाला लावली आहे. भाजप व काँग्रेसने इतर राज्यातील सक्रिय आमदारांना व आघाडीच्या नेत्यांना प्रचारासाठी जुंपले आहे.

भाजपने एका-एका मतदारसंघातील उमेदवाराच्या दिमतीला आमदार व इतर कार्यकर्त्यांची फौज दिली आहे. काँग्रेससाठी इतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. त्यांच्याकडूनही पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून रिंगणात उतरविले जाणार आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे, पक्षाचे आमदार व कोकणातील आमदार प्रचाराला येतील. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही गोव्यात एखादा दौरा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी पक्षाकडून तयारी सुरू असल्याचे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी हेही गोव्यामध्ये आहेत. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांच्यासह राष्ट्रीय मीडिया प्रभारी अलका लांबा, तसेच कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार गोव्यात असून, दोन फेब्रुवारी रोजी राहुल गांधी गोव्यात येणार आहेत.

प्रमुख नेते…

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासह काँग्रेसचे राहुल गांधी, प्रियांका गांधी त्याचबरोबर कार्यकारिणी समितीचे वरिष्ठ नेतेही गोव्यात प्रचारासाठी येणार आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा बारा दिवसांत पुन्हा गोवा दौरा निश्चित मानला जात आहे. त्याशिवाय तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जीही पुन्हा प्रचारासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button