Pegasus : पेगासस प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळाची शक्यता | पुढारी

Pegasus : पेगासस प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळाची शक्यता

पुढारी वृत्तसेवा; नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात होत असून पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाद्वारे अधिवेशनाची सुरुवात होईल. त्यानंतर सरकारकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाणार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्प मांडतील.
पेगासस (Pegasus) हेरगिरी प्रकरणी अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनंतर राजकीय पक्षांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे अधिवेशनात या मुद्द्यावरून तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. सरकारने संसद आणि सर्वोच्च न्यायालयाला धोका दिला असून लोकशाहीचा अपमान केल्याचा तसेच देशद्रोहाचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पेगासस प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पटलावर उत्तर द्यावे, अशी मागणीही विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे.
कोरोनाचे संकट लक्षात घेऊन सरकारने यावेळी बैठक वेळांत बदल केले आहेत. त्यानुसार राज्यसभेचे कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचे कामकाज सायंकाळच्या सत्रात होईल. याला अपवाद अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवसाचा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन टप्प्यात चालणार असून पहिल्या टप्प्यातले कामकाज 11 फेब्रुवारीपर्यंत चालेल. एक महिन्याच्या विश्रांतीनंतर 8 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातल्या कामकाजास सुरुवात होईल. त्यानंतर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अधिवेशन चालेल. वाढती महागाई, चीन सीमेवरील तणाव, कृषी क्षेत्राची दुरवस्था, कोविडमुळे मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना भरपाई, एअर इंडियाचे खाजगीकरण आदी मुद्द्यांवरून सरकारचीकोंडी करण्याचा निर्धार विरोधी पक्षांनी केला आहे.
हेही वाचलत का?

Back to top button