उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही याची हमी दिल्यास विचार करू : उदय सामंत | पुढारी

उत्पल पर्रीकर यांनी पुन्हा भाजपमध्ये जाणार नाही याची हमी दिल्यास विचार करू : उदय सामंत

पणजी : पुढारी वृत्तसेवा

निवडून आल्यानंतर उत्पल पर्रीकर पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत याची हमी जर त्यांनी दिली तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (मंगळवारी) सांगितले. शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी त्यांनी यावेळी जाहीर केली.

पणजी मतदारसंघातून शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे. पुढील जो काही निर्णय असेल तो खासदार संजय राऊत व पक्षप्रमुख घेतील असे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या पुढाकाराने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. युतीनंतर शिवसेनेने १० मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच राज्यातील निवडणुकीचे नियोजन कसे सुरु आहे हे पाहण्यासाठी मी आज आलो आहे. असे सामंत म्हणाले. तरुण, भूमिपुत्र यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे एक संघटन स्वयंरोजगारावर उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मांद्रे मतदारसंघातून बाबली नाईक यांचे नाव त्यांनी जाहीर केले. शिवोली मतदार संघातून याआधी विन्स्टन परेरा यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र आता शिवोलीतून त्यांच्या पत्नी करिष्मा फर्नांडिस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हापसा मतदारसंघातून राज्यप्रमुख जितेश कामत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र राष्टवादी काँग्रेसचे संजय बर्डे यांना निवडणूक लढवायची आहे याबाबत विचारले असता सामंत यांनी युतीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. याबाबत पक्षातील वरिष्ठ नेते चर्चा करतील व निर्णय घेतील मात्र शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील इतर राष्ट्रीय पक्षांसोबत युतींबाबत भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. याबाबत सर्व निर्णय वरिष्ठ घेतील असे ते म्हणाले. प्रादेशिक पक्षांशी युतीबाबत गोवा निवडणुकीचे अधिकार ज्यांना देण्यात आले आहेत ते संजय राऊत बोलतील असे ते म्हणाले. ३० तारखेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल व जिथे आवश्यकता असेल तिथे आदित्य ठाकरे यांना संजय राऊत घेऊन येतील असे ते म्हणाले.

‘गरजेपुरता लोकांचा वापर केला जातो’

माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली आहे. ज्या नेत्याने भाजपला देशात ताकद निर्माण करून दिली त्याच नेत्याच्या मुलाला उमेदवारी नाकारली जाते यावरून भाजप कार्यकर्ते व नेते यांचा गरजेपुरता वापर करून घेत असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकांनाही हे आता समजले आहे. असे त्यांनी सांगितले.

नागपुरात पुन्हा ‘न्यूड डान्स’, उमरेड नंतर मौदा तालुक्यातील लाजिरवाणा प्रकार समोर

गोवेकरांना एक सक्षम पर्याय देऊ

गोव्यात याआधी झालेल्या निवडणूका व सत्तांतरे यानंतर येथील नागरिक आता एका सक्षम पर्यायाच्या शोधात आहेत. वेगवेगळ्या पक्षांकडे गोवेकर पर्याय म्हणून बघत आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी यांची युती हा सक्षम पर्याय देऊ शकेल याची मला खात्री आहे. असे उदय सामंत यावेळी म्हणाले.

Back to top button