पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील ७५ हजार बेरोजगारांना दिवाळीत नोकरीचे ‘गिफ्ट’

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशातील ७५ हजार बेरोजगारांना दिवाळीत नोकरीचे ‘गिफ्ट’
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील वाढत्या बेरोजगारीला केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचा आरोप करीत विरोधकांकडून मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले जाते. विरोधकांच्या याच टीकेला आता केंद्र सरकार हजारो युवकांना 'नोकरी प्रमाणपत्र' देवून प्रत्युत्तर देणार आहे. ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील ७५ हजार युवकांना नोकरीचे 'गिफ्ट' देणार आहेत. शनिवारी (दि.२२) पंतप्रधान बेरोजगार युवकांना नोकरी प्रमाणपत्रांचे वितरण करणार आहेत.

शनिवारी ( दि. २२ ) व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी देशभरातील युवकांना संबोधित करीत बेरोजगार युवकांना नोकरी प्रमाणपत्रांचे वितरण करणार आहेत. या कार्यक्रमात देशातील वेगवेगळ्या शहरांमधून केंद्रीय मंत्री तसेच खासदार त्यांच्या लोकसभा मतदार संघातून हजर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ओडिशातून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातमधून केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया तसेच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर चंदीगड मधून कार्यक्रमात सहभागी होतील. जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व केंद्रीय विभाग तसेच केंद्रीय मंत्रालयांसोबत आढावा घेत दीड वर्षांमध्ये अर्थात डिसेंबर २०२३ पर्यंत १० लाख युवकांना नोकरी देणार असल्याचे जाहीर केले होते. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर या दिशेने वेगाने काम सुरू करण्यात आले होते. याच अनुषंगाने आता पंतप्रधानांच्या हस्ते युवकांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत.

देशभरातून निवडले गेलेले नवनियुक्त कर्मचारी, केंद्र सरकारच्या ३८ मंत्रालये, विभागांमध्ये कामावर रुजु होतील. यात अ श्रेणी, ब श्रेणी (राजपत्रित अधिकारी) तसेच ब श्रेणी (अराजपत्रित) आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या भरतीयोग्य पदांमध्ये केंद्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारी, उपनिरीक्षक, हवालदार, स्टेनो, स्वीय सचिव, प्राप्तिकर निरीक्षक, एमटीएस (शिपाई) अशा पदांचा समावेश आहे,अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मंत्रालये आणि विभागांद्वारे, स्वतः ही भरतीप्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण केली जात आहे, अथवा, केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ अशा संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया होत आहे. भरती प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी ती सुलभ आणि तंत्रज्ञानयुक्त करण्यात आल्याचे देखील पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news