T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या संघात ‘या’ खतरनाक ऑलराउंडरची एन्ट्री! | पुढारी

T20 World Cup: ऑस्ट्रेलियाच्या संघात ‘या’ खतरनाक ऑलराउंडरची एन्ट्री!

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने आपल्या टी 20 विश्वचषक संघात मोठा बदल केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्याच्या दोन दिवस आधी गतविजेत्या संघाने स्टार अष्टपैलू खेळाडूचा 15 खेळाडूंच्या संघात समावेश केला आहे. यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिस दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याच्या जागी कॅमेरून ग्रीनची यजमान संघात एन्ट्री झाली आहे.

ऑस्ट्रेलियाने येथे एक प्रकारची मोठी जोखीम पत्करली आहे. इंग्लिस हा यष्टिरक्षक फलंदाज असून मॅथ्यू वेडचा बॅकअप म्हणून त्याला संघात ठेवण्यात आले होते. पण दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू खेळाडू असलेल्या ग्रीनचा समावेश केला आहे. अशा परिस्थितीत आता ऑस्ट्रेलियन संघ केवळ एका यष्टिरक्षकासह आयसीसीच्या या मोठ्या क्रिकेट स्पर्धेत उतरणार आहे.

गोल्फ खेळताना इंग्लिस जखमी

जोश इंग्लिस बुधवारी गोल्फ खेळताना जखमी झाला. शॉट खेळताना त्याच्या हातावर गोल्फ स्टिक लागल्याने मोठी जखम झाली. त्यानंतर त्याच्या हातातून खूप रक्त वाहू लागले आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. पण इंग्लिसची दुखापत गंभीर नसली तरी तो पुढचे 2-3 आठवडे मैदानात उतरू शकणार नाही, अशी माहिती ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

भारत दौऱ्यावर ग्रीनची शानदार कामगिरी..

इंग्लिस बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी अष्टपैलू ग्रीनला संघात स्थान देण्यात आले आहे. नुकतेच भारत दौऱ्यावर ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी डावाची सुरुवात केली आणि सलग दोन अर्धशतके झळकावून आपली दखल घेण्यास भाग पाडले होते. पण असे असूनही या युवा अष्टपैलू खेळाडूला विश्वचषक संघात 15 खेळाडूंच्या संघात स्थान मिळाले नव्हते. अखेर इंग्लिस जखमी होऊन संघातून बाहेर पडल्याने त्याच्या जागी ग्रीनला प्राधान्य देण्यात आले. ग्रीन वेगवान धावा तसेच वेगवान गोलंदाजी करू शकतो आणि अशा परिस्थितीत तो संघासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो.

IND vs PAK T20 World Cup : भारत-पाकिस्तान सामना पावसात वाहून गेला तर काय होणार? जाणून घ्या…

ऑस्ट्रेलियाचा संघ :

अॅश्टन आगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, अॅरॉन फिंच (कर्णधार), जोश हेझलवूड, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा

ऑस्ट्रेलिया टी 20 विश्वचषक 2022 चे वेळापत्रक

22 ऑक्टोबर : विरुद्ध न्यूझीलंड, सिडनी
25 ऑक्टोबर : विरुद्ध क्वालिफायर, पर्थ
28 ऑक्टोबर : विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न
31 ऑक्टोबर : विरुद्ध क्वालिफायर, गाबा
4 नोव्हेंबर : विरुद्ध अफगाणिस्तान, अॅडलेड

Back to top button