Silvio Berlusconi | इटलीचे माजी पंतप्रधान बर्लुस्कोनी यांचे निधन, सेक्स स्कँडलमुळे होते चर्चेत

Silvio Berlusconi | इटलीचे माजी पंतप्रधान बर्लुस्कोनी यांचे निधन, सेक्स स्कँडलमुळे होते चर्चेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अब्जाधीश उद्योजक आणि इटलीचे माजी पंतप्रधान सिल्व्हियो बर्लुस्कोनी (Former Italian Prime Minister Silvio Berlusconi) यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. इटलीच्या मिलानमधील सॅन राफेल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. इटालियन सरकारने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बर्लुस्कोनी हे इटलीचे सर्वात श्रीमंत नेते होते आणि राजकारणात येण्यापूर्वी ते देशातील मीडिया उद्योगातील दिग्गज म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची एकूण कारकीर्द वादातीत होती.

इटलीचे उपपंतप्रधान मॅटेओ साल्विनी यांनी त्यांचा एक महान व्यक्ती आणि एक महान इटालियन असे उल्लेख करत बर्लुस्कोनी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. देशाचे संरक्षण मंत्री गुइडो क्रोसेटो यांनी ट्विट करत बर्लुस्कोनी यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असल्याचे म्हटले आहे. "माझं त्याच्यावर खूप प्रेम होतं. फेअरवेल सिल्व्हियो," असे क्रोसेटो यांनी पुढे नमूद केले आहे.

तीन वेळा इटलीचे पंतप्रधान

बर्लुस्कोनी १९९४ ते २०११ दरम्यान तीनवेळा इटलीचे पंतप्रधान होते. ते ल्युकेमियाने त्रस्त होते. त्यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्याच्या पश्चात त्याची ३३ वर्षीय गर्लफ्रेंड मार्टा फॅसिना, दोन पत्नी आणि पाच मुले असा परिवार आहे. १९३६ मध्ये मिलानमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. बर्लुस्कोनी हे इटलीतील सर्वात मोठे उद्योजक होते. १९८६ ते २०१७ या काळात त्याच्याकडे एसी मिलान फुटबॉल क्लबची (AC Milan football club) मालकी होती.

बर्लुस्कोनी यांचा फोर्झा इटालिया (Forza Italia party) हा पक्ष पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या उजव्या विचारसरणीच्या युतीचा एक भाग आहे. जरी त्यांची स्वतःची सरकारमध्ये भूमिका नसली तरी त्यांच्या मृत्यूमुळे येत्या काही महिन्यांत इटालियन राजकारण अस्थिर होण्याची शक्यता आहे.

अनेक आरोपांमुळे राहिले चर्चेत

त्याच्यावर करचोरी, लाचखोरीपासून ते भ्रष्टाचार आणि अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक संबंध अशा अनेक आरोप होते. त्यांच्यावर याबाबत अनेक खटले चालवण्यात आले होते. पण ते केवळ एकाच प्रकरणात अडकले. टेलिव्हिजन अधिकारांचा समावेश असलेल्या कर चुकवेगिरी प्रकरणात त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर सहा वर्षे बंदी घालण्यात आली होती. २०२२ मध्ये ते पुन्हा राजकारणात परतले. त्यावेळी त्यांनी इटलीच्या सिनेटमध्ये मोंजाच्या उत्तरेकडील नगरपालिकेचे प्रतिनिधित्व करत एक जागा जिंकली. फोर्झा इटालिया पक्षाच्या माहितीनुसार, २०२१ मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर दीर्घकाळापर्यंत उपचार सुरु होते. २०११ मध्ये त्याच्यावर ३३ महिलांसोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होता, तर २०१३ मध्ये त्यांना १७ वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी खुलासा करण्याची वेळ आली होती.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news