

पुढारी ऑनलाईन : झारखंडमधील (Jharkhand) चतरा येथे झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले आहेत. यातील दोघांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांची बक्षिसे होती. तर दोघांवर प्रत्येकी ५ लाखांची बक्षिसे होती. त्यांच्याकडून २ एके ४७ सह अन्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी अजूनही कारवाई असल्याची माहिती झारखंड पोलिसांनी दिली आहे.
या कारवाईत ठार झालेल्या पाच नक्षलवाद्यांमधील गौतम पासवान आणि चार्ली हे सीपीआय (माओवादी) च्या विशेष क्षेत्र समितीचे (SAC) सदस्य होते. त्यांच्यावर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तर नंदू, अमर गंझू आणि संजीव भुईयान हे सब-झोनल कमांडर होते. त्यांच्यांवर प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस होते. पुढील कारवाई सुरू असल्याचे झारखंड पोलिसांनी म्हटले आहे.
झारखंडच्या चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर ही चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांनी पलामू-चतरा सीमेवर नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान सीआरपीएफ कोब्रा बटालियन, आयआरबी यांच्यासह पलामू आणि चतरा जिल्हा दलांना तैनात करण्यात आले आहे.
पलामू-चतरा जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरू केली होती. याच दरम्यान सोमवारी सकाळच्या सुमारास नक्षल्यांनी गोळीबार सुरु केला. त्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात ५ नक्षलवादी ठार झाले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात दोन एके ४७ रायफल, दोन इन्सास रायफल आणि दोन देशी बनावटीच्या रायफल्सचा समावेश आहे.
यापूर्वी रविवारी छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात पोलिस आणि डीआरजीच्या संयुक्त पथकाने तीन नक्षलवाद्यांना अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समंद उर्फ सुमन सिंग अंचला (४२, संजय कुमार उसेंडी (२७) आणि परशराम धनगुल (५५) अशी अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहेत.
हे ही वाचा :