

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंचसमोरील रस्त्यावर बुधवारी (दि.19) रात्री सव्वा नऊच्या सुमारास करण्यात आलेला गोळीबार हा व्यापार्याला लुटण्यासाठी केल्याचे समोर आले आहे. तलेश हसमुखलाल सुरतवाला (वय 51,रा. माणिकबाग, सिंहगड रोड) असे व्यापार्याचे नाव आहे. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर गर्दीने गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. याप्रकरणी, सुरतवाला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार स्वारगेट पोलिसांनी मोटारसायकलवरील तिघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरतवाला हे गोळीबारात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरतवाला यांचे मंडईत तंबाखू आळीत चंदन टोबॅको नावाचे तंबाखू, सुपारी आणि सिगारेटचे किरकोळ आणि होलसेल विक्रीचे दुकान आहे. सकाळी साडेअकरा ते रात्री 9 वाजेपर्यंत ते दुकान चालवतात. दिवसभर जमा झालेली रोकड घेऊन घरी जातात. नेहमीप्रमाणे बुधवारी सुरतवाला हे रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास दुकान बंद करून दिवसभर जमा झालेली चार लाखांची रोकड घेऊन दुचाकीवरून घराकडे निघाले होते. सोबत नोकर रमेश तौर देखील होता. शिवाजी रोडने जेधे चौकात आल्यानंतर तेथून सिंहगड रोडने जात असताना, नऊ ते सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हॉटेल डायमंड आणि गणेश कला क्रिडा मंचच्यामध्ये अचानक दुचाकीवरून आलेल्या तिघांनी सुरतवाला यांच्या दुचाकीला आपली दुचाकी आडवी लावून त्यांना थांबविले.
त्याच वेळी एकाने त्यांची पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरतवाला यांनी त्याला विरोध केला. त्याने पिस्तूल काढून सुरतवाला यांच्या दिशने पायावर आणि पाठीवर अशा तीन गोळ्या झाडल्या. त्या वेळी नोकर तौर याने त्याच्याकडील टिफीन बॅग गोळी झाडणार्याच्या अंगावर फेकली. त्याने परत तौरच्या दिशने गोळी झाडली. सुदैवाने ती त्याला लागली नाही. झटापटीत आरोपीने गाडीला अडकविलेली पैशाची बॅग घेऊन सारसबागेच्या दिशेने पळ काढला. सुरतवाला यांच्या पायाला गोळी लागल्याने रस्त्यावर रक्ताचे मोठे डाग पडले होते. त्यानंतर ते रिक्षात बसून उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.
पोलिसांना गोळीबाराची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई यांनी घटनास्थळी धाव घेत. झाडलेल्या गोळीच्या पुंगळ्या घटनास्थळी मिळाल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
एकदा रेकी अन् दुसर्यांदा लुटीचा प्रयत्न
सुरतवाला यांची रेकी आरोपींनी केल्याचे दिसून आले आहे. सहा ते सात जुलै या कालावधीत ते घराजवळ गाडी पार्क करत असताना एका दुचाकीवर तीन अनोळखी व्यक्ती पाठलाग करत घरापर्यंत आल्या होत्या. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर 9 जुलै रोजी दुकान बंद करून रात्री घराकडे जात असताना, नऊ ते साडेनऊ वाजताच्या सुमारास टिळक स्मारक पुतळ्याच्या शेजारील गल्लीत एस.पी. कॉलेजच्या पाठीमागे असताना, दुचाकीवरील याच तिघांनी गाडीला गाडी आडवी लावून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुरतवाला यांनी तेथून पळ काढला होता. त्या वेळी देखील त्यांच्याकडे रोकड होती. त्यानंतर त्यांनी आपला घरी जाण्याचा मार्ग बदलला होता.
दुचाकीवर आलेल्या तिघांनी गोळीबार करून व्यापार्याकडील रोकड लुटली. या वेळी तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
सुनील झावरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, स्वारगेट
…..तर प्रसंग टाळता आला असता
यापूर्वी दोनदा सुरतवाला यांचा पाठलाग आरोपींनी केला होता. मात्र, हा प्रकार घडल्यानंतर देखील त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे आरोपींनी तिसर्यांदा पाठलाग आणि रेकी करून सुरतवाला यांच्यावर गोळीबार करून रोकड लुटली.
…तरी धडा नाही
स्वारगेट बसस्थानक परिसर हा नेहमीच प्रवाशांनी गजबजलेला असतो. त्यामुळे चोरटे सतत येथे सावज शोधत असतात. यापूर्वी देखील अशा घटना स्वारगेट परिसरात घडल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी येथील जेधे चौकात उस्मानाबाद येथून आलेल्या एका चालकाला चोरट्यांनी लुटण्यासाठी कोयत्याने मारहाण केली होती. घाव वर्मी लागल्याने ती व्यक्ती रात्रभर तेथेच पडून होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. तर, काही दिवसांपूर्वी सराईत गुन्हेगार असलेल्या रिक्षाचालकाने प्रवाशाचा दाताने कान तोडला होता.
हेही वाचा :