

पिंपरी : संतोष शिंदे : कुख्यात गुन्हेगार विठ्ठल शेलार याने शरद मोहोळ टोळीच्या एका सदस्याला पिस्तूल दाखवून धमकी दिली. त्यानंतर मोहोळ टोळीच्या सदस्यांनीदेखील शेलार टोळीवर तुफान दगडफेक करीत हल्ला चढवला.
तसेच, त्यांच्या वाहनांच्या काचाही फोडल्या. ही घटना 8 जानेवारी 2020 रोजी मध्यरात्री म्हाळुंगे येथे घडली होती. याप्रकरणी शेलार टोळीवर त्या वेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, फक्त 'पुढारी'नेच 'मुळशी पॅटर्न भडकणार' या मथळ्याखाली घटनेचे निर्भीडपणे वृत्तांकन केले होते. पोलिस खात्याच्या वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली.
'पुढारी'त छापलेल्या मजकुराची शहनिशा करून पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन बुधवारी (दि. 9) मोहोळ टोळीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत वृत्त असे, की मोहोळ टोळीचा सिद्धेश बाळू हागवणे (रा. म्हाळुंगे) हा बांधकाम साईटवर मटेरियल सप्लायचा व्यवसाय करतो. दरम्यान, त्याचा वाद विठ्ठल शेलार टोळीच्या एका सदस्याशी झाला होता.
त्यामुळे विठ्ठल शेलार याने म्हाळुंगे येथे हागवणे याच्या घराजवळ जाऊन त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच, पिस्तूल दाखवून उद्या तुझ्या अंत्यविधीसाठी नातेवाईक बोलावून ठेव, अशी धमकी दिली.
विठ्ठल शेलारच्या या कृत्यामुळे चिडलेल्या शरद मोहोळ टोळीच्या हस्तकांनी विरोधक विठ्ठल शेलार टोळीतील सदस्यांच्या गाडीवर दगड व कुंड्या फेकून हल्ला चढवला. तसेच, यामध्ये शेलार टोळीतील सदस्यांच्या वाहनांच्या काचा फुटल्या.
मोहोळ टोळी आक्रमक झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. या घटनेनंतर मोहोळ टोळीतील हागवणे याने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार, टोळीप्रमुख विठ्ठल शेलार याच्यासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला होता. मात्र, मोहोळ टोळीवर काहीच कारवाई केली नव्हती.
दरम्यान, 'पुढारी'ने घटनेचे सविस्तर वृत्तांकन केले. या वृत्ताची खात्यातील वरिष्ठ पातळीवर गंभीर दखल घेत मोहोळ टोळीवरही अखेर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शरद हिरामण मोहोळ (रा. कोथरूड), आलोक शिवाजी भालेराव (रा. वडाची वाडी, पौड रोड, कोथरूड)
मल्हारी मसुगडे (रा. माळवाडी, पुनावळे), सिद्धेश बाहू हगवणे (30, रा. म्हाळुंगे, पुणे) आणि पाच ते सहा अनोळखी इसम (नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, यापूर्वी सिद्धेश बाळू हागवणे (30, रा. म्हाळुंगे) याच्या फिर्यादीनुसार विठ्ठल शेलार आणि त्याच्या इतर साथीदारांवर गुन्हा नोंद आहे.
घटनेच्या दिवशी शरद मोहोळ हा दिवसभर वाकड येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्याच्या वाढदिवसाचे केक कापण्यात व्यस्त होता. मोहोळ याने शेलार टोळीतील सदस्य फोडून आयटी परिसरात आपले प्रस्थ उभारण्यास सुरुवात केल्याची चर्चा होती.
यातील विशेष बाब म्हणजे मोहोळ दिवसभर वाकडच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये असूनही पोलिसांना कानोकान खबर नव्हती. 'पुढारी'ने याबाबत वृत्त दिल्यानंतर पोलिसांनी संबंधित हॉटेल्सचे सीसीटीव्ही तपासून खातरजमा केली.
पोलिस आक्रमक झाल्याचे पाहून दोन्ही टोळ्यांनी मध्यस्थांच्यामार्फत आपसात मांडवली करून घेतली. विठ्ठल शेलारवर गुन्हा दाखल केल्यानंतर फिर्यादी सिद्धेश बाळू हागवणे (30, रा. म्हाळुंगे) हा न्यायालयात फितूर झाला.
हागवणे याने आपली काही तक्रार नसल्याचे सांगून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले. तसेच, वाहनांची तोडफोड, दगडफेक करूनही शेलार टोळीने मोहोळ टोळीच्या विरोधात फिर्याद दिली नाही.
दरम्यानच्या काळात हिंजवडी पोलिसांनी शेलार टोळीला तक्रार देण्यासाठी आवाहन केले. मात्र, शेलार टोळीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेवटी पोलिसांना स्वतः फिर्यादी होऊन मोहोळ टोळीवर गुन्हा दाखल करावा लागला.
https://youtu.be/gfZJcopVz0g