

पुढारी ऑनलाईन डेस्क : फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा १ – ० अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे मोरोक्कोने पहिल्यांदाच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. युसुफ एन-नेसरीने सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलमुळे मोरोक्कोने पोर्तुगालचा पराभव केला. (FIFA WC 2022)
या विजयासह मोरोक्को संघाने इतिहास रचला आहे. हा संघ उपांत्य फेरी गाठणारा पहिला आफ्रिकन संघ ठरला आहे. यापूर्वी कोणताही आफ्रिकन देश फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला नव्हता. अल थुमामा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मोरोक्कोने पोर्तुगालचा १-० असा पराभव केला. या पराभवासह पोर्तुगाल आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोची मोहीम संपुष्टात आली. सामना संपल्यानंतर रोनाल्डोचे डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. (FIFA WC 2022)
मोरोक्कोपूर्वी आफ्रिकेतील तीन संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते, मात्र त्या संघांना पराभवाला सामोरे जावे लागले. १९९० मध्ये कॅमेरून, २००२ मध्ये सेनेगल आणि २०१० मध्ये घाना उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाले होते. त्याचबरोबर पोर्तुगालचा संघ पहिल्यांदाच फिफा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला आहे. याआधी दोनदा संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. १९६६ आणि २००६ साली झालेल्या फुटबॉल विश्वषक स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोर्तुगालने मजल मारली होती.
सामन्याच्या सुरूवातीला बेंचवर असलेल्या रोनाल्डो ५१ व्या मिनिटाला राफेल गुरेरोच्या जागी बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. त्याचवेळी रुबेन नेव्हसच्या जागी जोआओ कॅन्सेलोलाही स्थान देण्यात आले. रोनाल्डोने मैदानात उतरताच मोठा विक्रम केला. त्याने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. रोनाल्डोचा हा १९६ वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्याने कुवेतच्या बादर अल मुतावाच्या विक्रमाची बरोबरी केली.
पहिल्या हाफमध्ये मोरोक्कोने पोर्तुगालवर १-० अशी आघाडी घेत इतिहास रचला. नेसरीने ४२ व्या मिनिटाला हेडरने गोल करत सामन्यात मोरोक्कोला आघाडी मिळवून दिली. या गोलची पोर्तुगालला शेवटपर्यंत परतफेड न करता आल्यामुळे त्यांचा यंदाचा फुटबॉल विश्वचषकातील प्रवासात मोरोक्कोने खंड पाडला. या सह फुटबॉल विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे रोनाल्डोचे स्वप्न भंगले.
हेही वाचा;