

Astrocartography Astrology Travel : तुम्ही सुट्टीत फिरायला जायचं प्लॅनिंग कसं करता? अलीकडील काळात काही जण सोशल मीडियावरील रील किंवा चित्रपटातील लोकेशन पाहून आपलं ट्रॅव्हल डेस्टिनेशन ठरवतात, तर काही जण मित्रांनी सुचवलेल्या पर्यटनस्थळांची निवड करतात; पण पर्यटनासाठी चक्क ज्योतिषाचा सल्ला घेऊन प्लॅनिंग केले जाते, हे ऐकल्यावर तुम्हाला थोडे अचंबित होईल; पण नवीन ट्रेंडनुसार हे एक वास्तव्य आहे. काही जण जन्मकुंडलीतील ग्रहस्थितीनुसार प्रवासाचे नियोजन करतात. अलीकडेच एका सर्वेक्षणानुसार, सुमारे २२ टक्के भारतीय प्रवाशांनी प्रवासासाठी शुभ वेळ असल्याचे ज्योतिषाने सांगितल्यामुळेच आपला प्रवास निश्चित केला आहे.
'बुकिंग डॉट कॉम'च्या (Booking.com) एका अलीकडील सर्वेक्षणात असे आढळले की, सुमारे २२ टक्के भारतीय प्रवाशांनी प्रवासासाठी शुभ वेळ असल्याचे ज्योतिषाने सांगितल्यामुळेच आपला प्रवास निश्चित केला आहे. प्रवासाच्या नियोजनासाठी ज्योतिषाचा सल्ला घेणे ही खरोखरच एक प्रचलित पद्धत आहे. याला 'ॲस्ट्रोकार्टोग्राफी' (astrocartography) असे म्हणतात.
कोठे पर्यटनासाठी जावे, याचे उत्तर 'ॲस्ट्रोकार्टोग्राफी'च्या माध्यमातून घेणाऱ्यांचा टक्का सध्या वाढतो. या पद्धतीत तुमची जन्मकुंडली जगाच्या नकाशावर मांडली जाते. यानुसार जगभरातील विविध भौगोलिक ठिकाणे तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पाडतात, याचे भाकीत केले जाते. त्यामुळे पर्यटनासाठीचे ठिकाण ठरवताना ॲस्ट्रोकार्टोग्राफीचा आधार घेतला जातो.
सोप्या भाषेत सांगायचे तर, 'ॲस्ट्रोकार्टोग्राफी'मध्ये संबंधितांची जन्मतारीख, वेळ आणि ठिकाणावर आधारित जन्मकुंडली घेतली जाते. यानंतर ती जगाच्या नकाशावर प्रक्षेपित केली जाते. यामुळे नकाशावर विविध ठिकाणांहून जाणाऱ्या ग्रहांच्या रेषा तयार होतात. प्रत्येक रेषेचा तुमच्या आयुष्याच्या एका विशिष्ट पैलूवर प्रभाव पडतो, असे मानले जाते. त्यानंतर तयार झालेला नकाशा एका 'कॉस्मिक ट्रॅव्हल गाइड'प्रमाणे (वैश्विक प्रवास मार्गदर्शक) वाचला जातो; यात प्रेम, महत्त्वाकांक्षा, सुदैव किंवा वैयक्तिक परिवर्तनाशी संबंधित ठिकाणे अधोरेखित केली जातात.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीची 'शुक्र' (Venus) रेषा ग्रीसमधून जात असेल, तर 'ॲस्ट्रोकार्टोग्राफर' तुम्हाला सांगू शकेल की, ते शहर प्रेम, नातेसंबंध किंवा आयुष्यातील सुखद गोष्टींचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण ठरू शकते. वास्तविक, ही पद्धत केवळ सुट्टीसाठी ठिकाण निवडण्यापुरती मर्यादित नाही. पाश्चात्य देशांमध्ये काही लोक कामासाठी स्थलांतर करणे, नवीन घर शोधणे किंवा अगदी नव्याने आयुष्य सुरू करणे यांसारख्या गोष्टींचा विचार करण्यासाठीही 'ॲस्ट्रोकार्टोग्राफी'चा वापर करतात.
ही संकल्पना तशी नवीन नाही. 'बीबीसी'च्या रिपोर्टनुसार, १९७० च्या सुमारास 'ॲस्ट्रोकार्टोग्राफी' लोकप्रिय झाली. सुरुवातीला ती बऱ्याच अंशी ज्योतिषशास्त्राच्या वर्तुळापुरती मर्यादित होती; परंतु आज प्रवासी मोठ्या प्रमाणावर तिचा वापर करत आहेत. 'नॅशनल जिओग्राफिक'नेही अलीकडेच याला प्रवासाचा एक नवीन ट्रेंड, असे नमूद केले आहे.
या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे प्रवासाचे स्वरूप बदलले आहे. अनेक लोकांसाठी सुट्टी म्हणजे आता केवळ प्रसिद्ध पर्यटन स्थळांना भेट देऊन ती यादी पूर्ण करणे एवढेच उरलेले नाही. वैयक्तिक वाटणाऱ्या सहलींमध्ये लोकांची आवड वाढत आहे. वेलनेस रिट्रीट्स, आध्यात्मिक यात्रा, एकट्याने केलेला प्रवास, डिजिटल नोमॅडचे अनुभव आणि ‘मला स्वतःला शोधायचे आहे’ अशा प्रकारच्या काहीशा नाट्यमय पर्यटनातही वाढ झाली आहे. अर्थात, यापैकी कशाचाही अर्थ असा नाही की, एखाद्या विशिष्ट शहराचे विमान तिकीट काढल्याने प्रेम, पैसा किंवा व्यक्तिमत्त्वात परिवर्तनाची हमी मिळते. ॲस्ट्रोकार्टोग्राफी ही एक ज्योतिषशास्त्रीय पद्धत आहे; तुम्ही प्रवास केल्यावर काय घडेल, याचे वैज्ञानिकदृष्ट्या स्थापित केलेले भाकीत करण्याची पद्धत नाही.