Women Solo Travel | 'माझा प्रवास, माझ्या अटींवर!'

Women Solo Travel |
Women Solo Travel | 'माझा प्रवास, माझ्या अटींवर!'
Published on
Updated on

कावेरी गिरी

महिलांच्या सोलो ट्रॅव्हलची वाढती क्रेझ हा केवळ पर्यटन क्षेत्रातील बदल नाही, तर समाजातील बदलत्या विचारांचा आरसा आहे. स्त्री आता स्वतःची स्वप्ने पाहते, त्यासाठी मेहनत करते, पैसे साठवते आणि ती स्वप्ने प्रत्यक्षातही उतरवते. 'एकटी आहे म्हणून थांबायचे नाही, तर स्वतःच्या बळावर पुढे जायचे,' हा तिचा नवा आत्मविश्वास आहे.

एकेकाळी घराबाहेर पडताना कुटुंबातील पुरुषांची साथ आवश्यक मानली जायची. सहली, पर्यटन किंवा दूरचा प्रवास हा वडील, भाऊ किंवा पतीसोबतच करायचा, अशी सामाजिक चौकट होती; मात्र गेल्या काही वर्षांत हे चित्र झपाट्याने बदलत आहे. आज अनेक महिला केवळ घरातील जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या व्यक्ती म्हणून नव्हे, तर स्वतःची स्वप्ने पूर्ण करणाऱ्या, स्वतःचे निर्णय घेणाऱ्या आणि जग स्वतःच्या नजरेतून पाहण्याची इच्छा असलेल्या स्वतंत्र व्यक्ती म्हणून पुढे येत आहेत. त्याचा सर्वात ठळक परिणाम पर्यटन क्षेत्रात दिसून येतो. सोलो ट्रॅव्हल किंवा केवळ महिलांचे गट करून प्रवास करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. आज अनेक पर्यटन संस्था फक्त महिलांसाठी विशेष सहली आयोजित करत आहेत. या सहलींना प्रतिसादही मोठ्या प्रमाणावर मिळतो. काही ठिकाणी तर नोंदणी सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच सर्व जागा भरून जातात. या प्रवासामागे केवळ पर्यटनाचा हेतू नसतो, तर स्वतःला शोधण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा आणि दैनंदिन आयुष्यातून काही काळ बाहेर पडून स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न असतो.

महिलांच्या सोलो प्रवासामागे एक महत्त्वाचा विचार दिसून येतो तो म्हणजे, 'पुरुषांवर अवलंबून राहायचे नाही.' प्रत्येक वेळी कोणीतरी सोबत असेल, त्याची वाट पाहायची किंवा त्याच्या वेळेनुसार स्वतःचे नियोजन करायचे, ही मानसिकता आता बदलत आहे. 'मला प्रवास करायचा आहे, तर मी करणार,' हा आत्मविश्वास अनेक महिलांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच त्या स्वतःच प्रवासाचे नियोजन करतात, बुकिंग करतात, विमानाने किंवा रेल्वेने प्रवास करतात आणि नवीन ठिकाणांचा अनुभव घेतात. पूर्वी महिलांच्या सहली धार्मिक पर्यटनापुरत्याच मर्यादित असायच्या. पंढरपूर, काशी, तिरुपती, वैष्णोदेवी किंवा इतर तीर्थक्षेत्रांमध्ये महिला मोठ्या संख्येने जात असत. आता मात्र धार्मिक पर्यटनाबरोबरच काश्मीर, शिमला, मनाली, लेह-लडाख, स्पिती व्हॅली, ईशान्य भारत, केरळ, अंदमान, गोवा अशा विविध ठिकाणांनाही महिलांची पसंती मिळत आहे. परदेशातील भूतान, नेपाळ, बाली, व्हिएतनाम आणि थायलंडसारख्या देशांमध्येही महिलांचे स्वतंत्र गट पर्यटनासाठी जात असल्याचे चित्र दिसते.

थायलंडचा उल्लेख केला की, पूर्वी समाजात त्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जायचे. अनेकांच्या मनात तो पुरुषांच्या पर्यटनाशी जोडला जात असे; मात्र आता हे चित्र बदलले आहे. सुंदर समुद्रकिनारे, बेटं, सांस्कृतिक वारसा, निसर्ग आणि परवडणारा खर्च यामुळे अनेक महिला मैत्रिणींसोबत किंवा महिलांच्या गटासोबत थायलंडला जात आहेत. पर्यटनाची व्याख्या बदलत असल्याचे हे उदाहरण आहे. महिलांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या सहलींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सुरक्षिततेची भावना. समान विचारांच्या महिलांचा गट, अनुभवी महिला टूर लीडर, नियोजित कार्यक्रम आणि एकमेकांची काळजी घेणारे वातावरण यामुळे महिलांना अधिक सुरक्षित वाटते. त्यामुळे प्रथमच घराबाहेर दूरचा प्रवास करणाऱ्या महिलाही अशा सहलींना प्राधान्य देतात.

आज अनेक महिला स्वतःच्या मनाप्रमाणे प्रवास करण्याचा आग्रह धरतात. सकाळी उशिरा उठायचे की सूर्योदय पाहायचा, खरेदी करायची की ट्रेकिंगला जायचे, संग्रहालय पाहायचे की एखाद्या कॅफेमध्ये तासन्‌ तास बसायचे, याचा निर्णय त्या स्वतः घेतात. 'माझ्या मनाची मर्जी' हा या प्रवासाचा खरा आनंद आहे. कोणालाही खूश करण्याची गरज नसते आणि कोणाच्याही आवडीनिवडींशी तडजोड करावी लागत नाही. काही महिला तर आणखी एक पाऊल पुढे टाकत स्वतःच्या दुचाकीवर देशभर फिरतात. 'रायडिंग' हा आता केवळ पुरुषांचा छंद राहिलेला नाही. हिमालयातील रस्ते, किनारपट्टी, घाटमार्ग अशा विविध भागांत महिला रायडर्स दिसू लागल्या आहेत. खासकरून बुलेट रायडिंग. काही जणी सायकलवरूनही लांब पल्ल्याच्या मोहिमा पूर्ण करत आहेत. या प्रवासातून त्या केवळ निसर्ग अनुभवत नाहीत, तर स्वतःची क्षमता आणि जिद्दही सिद्ध करत आहेत.

विशेष म्हणजे, या सहलींसाठी अनेक महिला स्वतंत्र आर्थिक नियोजन करतात. काही जणी दर महिन्याला ठरावीक रक्कम बाजूला ठेवतात. काही 'ट्रॅव्हल फंड' तयार करतात, तर काही मैत्रिणी मिळून बचत गटाच्या माध्यमातून प्रवासासाठी पैसे साठवतात. आज अनेक तरुणी नोकरी करताना वर्षातून एकदा तरी परदेशात किंवा भारतातील एखाद्या नव्या ठिकाणी फिरण्याचे लक्ष्य ठेवतात. काही अविवाहित मुली तर 'प्रवासासाठी कमवायचे' हा स्पष्ट दृष्टिकोन ठेवून आर्थिक नियोजन करतात.

विवाहित महिलांमध्येही हा बदल स्पष्ट दिसतो. घर, संसार, मुलं आणि नोकरी यांच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच वर्षातून काही दिवस स्वतःसाठी काढण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कुटुंबीयांची संमती घेऊन काही दिवस महिलांच्या गटासोबत प्रवास करणे, हा आता अनेक कुटुंबांमध्ये सहज स्वीकारला जात आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो, नवीन ऊर्जा मिळते आणि पुन्हा दैनंदिन आयुष्यात उत्साहाने काम करता येते. काही महिलांसाठी विमान प्रवास हा स्वतःमध्येच एक अनुभव असतो. अनेक जणी मुद्दाम अशा सहली निवडता, ज्यामध्ये विमान प्रवासाचा आनंद घेता येईल. पहिल्यांदाच विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही अनेक महिला पर्यटनाचा पर्याय निवडतात. त्यामुळे प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा मार्ग न राहता आयुष्य समृद्ध करणारा अनुभव ठरत आहे.

सोशल मीडियानेही या बदलाला मोठी चालना दिली आहे. इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर महिला ट्रॅव्हल ब्लॉगरचे अनुभव पाहून अनेक महिलांना प्रेरणा मिळते. प्रवासातील माहिती, सुरक्षिततेच्या टिप्स, कमी खर्चात फिरण्याचे पर्याय आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे. त्यामुळे 'मीही हे करू शकते' हा विचार अधिक दृढ होत आहे. अर्थात, सोलो ट्रॅव्हल करताना सुरक्षिततेची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे. प्रवासाचे नियोजन, विश्वासार्ह निवासस्थान, कुटुंबीयांना माहिती देणे, आवश्यक कागदपत्रे आणि आपत्कालीन संपर्क जवळ ठेवणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करता येणार नाही. स्वातंत्र्य बरोबर जबाबदारीची जाणीवही महत्त्वाची आहे.

महिलांच्या सोलो ट्रॅव्हलची वाढती क्रेझ हा केवळ पर्यटन क्षेत्रातील बदल नाही, तर समाजातील बदलत्या विचारांचा आरसा आहे. स्त्री आता स्वतःची स्वप्ने पाहते, त्यासाठी मेहनत करते, पैसे साठवते आणि ती स्वप्ने प्रत्यक्षातही उतरवते. 'एकटी आहे म्हणून थांबायचे नाही, तर स्वतःच्या बळावर पुढे जायचे,' हा तिचा नवा आत्मविश्वास आहे. प्रवास तिच्यासाठी आता केवळ पर्यटन राहिलेले नाही, तर स्वतःला ओळखण्याचा, स्वतःला सिद्ध करण्याचा आणि आयुष्य अधिक समृद्ध करण्याचा सुंदर प्रवास बनला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news