

मुंबई: दिल्लीचा एक तरुण, अंकुश गोयल त्याच्या एका विलक्षण रेकॉर्डमुळे सध्या चर्चेत आहे. Apple कंपनीची iPhone 17 Pro Max स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तो रात्रभर जेवण आणि पावर बँक घेऊन मुंबईतील ॲपलच्या बीकेसी स्टोअरबाहेर उभा राहिला होता. या प्रयत्नामुळे त्याला भारतातील पहिला iPhone 17 Pro Max खरेदी करण्याचा मान मिळाला आहे.
दरवर्षी ॲपलच्या नवीन आयफोनच्या लाँचवेळी देशभरात मोठी गर्दी दिसून येते. मात्र, मुंबईतील ॲपल स्टोअरबाहेर दिसलेली क्रेझ यावर्षी लक्षवेधी ठरली. या गर्दीतूनच 26 वर्षीय अंकुश गोयलचे नाव समोर आले. एका रिपोर्टनुसार, मार्केटिंग प्रोफेशनल असलेला अंकुश हा आयफोन 16 आणि 15 सिरीजचा देखील भारतातील पहिला ग्राहक ठरला होता. अमेरिका आणि इतर देशांमध्ये आयफोन लाँचच्या वेळी दिसणाऱ्या उत्साहानेच त्याला प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले.
गुरुवार (दि.१८) रात्रीपासूनच अंकुशने ॲपल स्टोअरबाहेर आपली जागा पकडली. सोबत जेवणाचा डबा आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक होती. तासन्तास रांगेत उभे राहिल्यानंतर, सकाळी त्याने सर्वात आधी 256GB स्टोरेज असलेला iPhone 17 Pro Max खरेदी केला. आयफोनला घेऊन असलेले त्याचे हे वेड पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. अंकुशचे हे कृत्य सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आले आहे. काही लोक त्याच्या या उत्साहाचे कौतुक करत आहेत, तर काहीजण मात्र त्याची चेष्टा करत आहेत. काही युजर्सनी तर त्याला 'पद्मश्री' पुरस्कार देण्याची मागणी करत मिश्कील टिप्पणी केली आहे. मात्र, तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी तो एक प्रेरणा बनला आहे.
यावर्षी आयफोन 17 सिरीजसाठी मुंबईमध्ये मोठा उत्साह दिसला. बीकेसी स्टोअरबाहेर काही काळासाठी किरकोळ वादही झाले, परंतु लवकरच परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. जगभरात आयफोन 17 ची विक्री सुरू झाली असून चीनची राजधानी बीजिंग आणि दिल्लीतील साकेत येथील ॲपल स्टोअर्सबाहेरही ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.