खाणं आणि झोप या दोन गोष्टी मानवी जीवनासाठी आवश्यक तर आहेतच, पण प्रामाणिकपणे विचार केला तर आपल्यातल्या बर्याच लोकांच्या आवडीच्याही आहेत. खरं तर म्हणूनच त्या संदर्भात अधिक माहिती करून घेणं हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या द़ृष्टीनं हिताचं मानलं जातं. किती झोपणं चांगलं, कधी झोपणं चांगलं, असे प्रश्न आपल्यातल्या अनेकांना पडत असतात. तर साधारणपणे विज्ञान असं सांगतं की, तरुण आणि प्रौढ वयात माणसाला सात ते आठ तास झोपेची गरज असते.
वाढत्या वयाबरोबर यात बदल होऊ लागतात. पहिला बदल म्हणजे झोपेची एकूण लांबी कमी होत जाते व साधारण वयाच्या सत्तराव्या वर्षापर्यंत ती पाच, साडेपाच, सहा तासांपर्यंत येते. दुसरा बदल होतो तो म्हणजे ती झोप सलग न लागता झोपेच्या एकूण काळाचे तुकडे पडतात. सोपं करून सांगायचं तर, रात्री साडेचार पाच तास झोप लागल्यास दुपारी एक तास लागेल, असं! काही व्यक्तींना तरुण वयातदेखील पूर्ण आठ तास रात्री न झोपता आल्यास राहिलेली झोप दुपारी झोपून भरून काढणं आवश्यक असतं. दुपारी झोपल्यामुळं रात्री झोप येण्यात अडचण येत आहे, असं वाटल्यास दुपारची झोप प्रयत्नपूर्वक टाळणं इष्ट ठरतं.
काही जणांच्या बाबतीत असंही घडतं की, पाऊण ते एक तास दुपारी गाढ झोप लागते, ताजंतवानं वाटतं, संध्याकाळी थकवा जाणवत नाही आणि रात्री झोपण्यास आडकाठीही होत नाही. जर दुपारी जेवून झोपायचं असेल तर झोपताना डाव्या कुशीवर झोपल्यानं आपल्या जठरातून लहान आतड्यात अन्नाला जाऊ देणारा दरवाजा उजवीकडे म्हणजे वरच्या बाजूला येतो आणि अन्नावर तरंगणारे तेल-तुपासारखे स्निग्ध पदार्थ लवकर लहान आतड्यात निघून जातात. त्यामुळं त्या व्यक्तीला पोट लवकर रिकामं झाल्याची भावना येते. पोट रिकामं झाल्याची भावना लवकर आली नाही, सतत आणि जास्त खावंसं वाटलं तर मेदवृद्धीची शक्यता बळावते. म्हणून वजन कमी करण्याची किंवा पोटाचा घेर संतुलित ठेवण्याची इच्छा असणार्यांनी दुपारी वामकुक्षी टाळलेली बरी, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.