Life Style Fashion Trend : ट्रायबल ज्वेलरी देतात ‘परफेक्ट लूक’ | पुढारी

Life Style Fashion Trend : ट्रायबल ज्वेलरी देतात 'परफेक्ट लूक'

वेदिका कुलकर्णी

Life Style Fashion Trend : आदिवासींचे जीवन शहरी भागातील लोकजनांना मागासलेले वाटते; पण आधुनिक आणि पुढारलेल्या जगाने त्यांच्याकडून घ्याव्यात अशा अनेक बाबी आहेत. निसर्गाशी तादात्म्य पावलेले हे लोक आपल्याला स्वत:पलीकडे जगायला शिकवतात. आजकाल आदिवासींच्या दागिन्यांचा ट्रेंडही चांगलाच लोकप्रिय होत आहे. सोन्या-चांदीचे किंवा हिर्‍यांचे दागिने काही विशिष्ट प्रसंगीच खुलून दिसतात. रोज हे दागिने वापरणे आता जोखमीचे असते आणि ते फारसे संयुक्तिकही वाटत नाही.

पूर्वीच्या किंवा अगदी आपल्या आईच्या पिढीतील स्त्रिया सगळे सोन्याचे दागिने रोज अंगावर घालतात; पण तरुणींना इतके दागिने घालायला फारसे आवडत नाही. शिवाय त्या नोकरी, व्यवसायानिमित्त बाहेर जात असल्याने इतके सगळे दागिने घालून फिरणे गैरसोयीचे वाटते, शिवाय त्यात जोखीमही असते. म्हणून सुटसुटीत वाटणारे, पोशाखाला अनुरूप असे दागिने घालण्याकडे त्यांचा कल असतो. त्यातच आता ट्रायबल ज्वेलरी किंवा आदिवासी दागिने हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला आहे. (Life Style Fashion Trend)

Life Style Fashion Trend : बजेट फ्रेंडली, रोज वापरता येणाऱ्या आणि परफेक्ट लूक

तरुणींना आता असे दागिने हवे आहेत जे फार महाग असणार नाहीत, रोजही परिधान करता येतील आणि त्यांचा लूकही परफेक्ट करेल. त्या द़ृष्टीने ट्रायबल ज्वेलरी सगळ्यात उत्कृष्ट आहे. आजकाल फॅशनमध्ये हा प्रकार सर्वाधिक लोकप्रिय आहे. ही ज्वेलरी एक तर फारशी महाग असत नाही आणि स्टाईलमध्ये तर तिची कुणाशी तुलनाच होऊ शकत नाही.

आता कॉलेजला जाणार्‍या तरुणी, शिक्षण संपलेल्या तरुणींमध्ये ही ज्वेलरी कमालीची आवडती आहे. अगदी हायसोसायटीतील स्त्रियाही या दागिन्यांना पसंत करत असल्याचे दिसते. चांदी, तांबे, लोखंड, हस्तिदंत, वेगवेगळे खडे आणि रंगीबेरंगी मण्यांपासून हे दागिने प्रामुख्याने तयार करतात.

त्यात सूर्य, चंद्र, तारे अशा घटकांचे डिझाईन असते. प्राण्यांच्या आकाराची नक्षीही त्यावर कोरलेली असते. हे दागिने अगदी रोज वापरले तरी चालते. वेस्टर्न वेअरवर ही ज्वेलरी अतिशय उठावदार दिसते तशी साडीसारख्या पारंपरिक वेशभूषेबरोबरही ती शोभून दिसते. त्यामुळे सगळ्या वयोगटातील महिलांना ही ज्वेलरी चांगलीच भावते आहे. (दागिना)

हेही वाचा : 

Back to top button