राधिका बिवलकर
नव्या फॅशन्स आल्या की बाजारात त्यातील भरपूर पर्याय उपलब्ध होतात. सध्या ऑफ शोल्डर प्रकारातील ड्रेसची फॅशन आहेच. त्यावर दागिने काय घालायचे? हा प्रश्न आता पडणार नाही. कारण त्यासाठी नवी स्टायलिश प्रकार आहे तो म्हणजे शोल्डर ज्वेलरी. अनेकविध प्रकार यात मिळतील. ते वापरल्यास आपले स्वतःचे एक स्टाईल स्टेटमेंट बनू शकते.
फॅशनच्या विश्वात सध्या ज्वेलरीचा नवा ट्रेंड आलाय, तो म्हणजे शोल्डर ज्वेलरी. थोडक्यात खांद्यावर घालायचे दागिने. ऑफ शोल्डर ड्रेसेसची फॅशन सध्या आहेच. त्यावर ही ज्वेलरी म्हणजे क्या बात है!
वेगळे डिझाईन : शोल्डर ज्वेलरीमध्ये अनेक पॅटर्न आणि विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने चेन पॅटर्नवर अधिक भर दिलेला दिसून येतो. ही ज्वेलरी आपल्या गळ्यापासून खांद्याएवढी असते. काही प्रकारची शोल्डर ज्वेलरी नेकपिस म्हणजे गळ्यातल्या दागिन्यांशी जोडूनही घालता येते; तर काही प्रकारात फक्त शोल्डर ज्वेलरीही घालता येते. शोल्डर ज्वेलरीमध्ये भरगच्च ज्वेलरीचा पर्यायही मिळतो. ही ज्वेलरी खांद्यांबरोबर पाठीवर असते. शोल्डर ज्वेलरी शक्यतो ऑफ शोल्डर किंवा वनशोल्डर असणार्या पोशाखावरच घाला. तर तो अधिक खुलून दिसेल.
शोल्डर ज्वेलरीमध्ये शक्यतो बिड्स आणि क्रिस्टल यांच्यावर भर दिलेला दिसतो. रंगीबेरंगी क्रिस्टल्स किंवा बीडस लावून ते सजवले जाते. त्याशिवाय मोती, चांदी किंवा फुले यांचे पॅटर्नचा वापर केला जातो.
शोल्डर ज्वेलरी हा प्रकार बहुतेकवेळा पाश्चिमात्त्य कपड्यांवर अधिक खुलून दिसतो. तसेच फ्यूजन ड्रेसवरही ही ज्वेलरी छान दिसते. ऑफशोल्डर गाऊन, टी शर्ट, वनशोल्डर टॉप्स यावर हे दागिने वापरावेत. एखाद्या ड्रेसचा गळा मोठा असेल, आढे खोल असले तरीही तुम्ही ही ज्वेलरी घालू शकता. त्यामुळे भारतीय पोशाखातील मोठ्या गळ्याच्या ब्लाऊजवरही ही ज्वेलरी सूट होते.