

Harsh Goenka Lilies Bloom Video: नामिबिया हा त्यांच्या निसर्गसौंदऱ्यासाठी आणि मोठ्या लँडस्केपसाठी प्रसिद्ध आहे. तिथं मोठं वाळवंटं देखील असून जगातील काही भन्नाट नैसर्गिक आश्चर्य देखील आहेत. मात्र नामिबियात काही असे देखील नैसर्गिक चमत्कार घडतात जे चमत्कार फक्त काही दिवसच असतात.
तशाच एका चमत्काराचा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. नामिबियात सध्या पावसाळा असून तिथल्या वाळवंटात मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळं एक नैसर्गिक अत्यंत दुर्मिळ असा नजारा निर्माण झाला आहे.
जवळपास १० लाखाच्यावर गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची लिलीची फुले उमलली आहेत. हा एक दुर्मिळ असा निसर्गसोहळा आहे. ही फुले ७०० हेक्टर भागात उमलली असून ती अवघ्या आठवड्याभारत नाहीशी झाली.
हाच व्हिडिओ हर्ष गोयंका यांनी आपल्या एक्सवर शेअर केला. ते हा व्हिडिओ शेअर करून म्हणाले, 'नामिबियामध्ये रूक्ष वाळवंटाचे एका रात्रीत रूपांतर एका लिलीच्या मोठ्या सुमुद्रात झालं. ही फुले फक्त ५ ते आठ दिवसाच उमलतात त्यानंतर ती नाहीशी होतात. जवळपास एक वर्ष ही गायबच असतात. हा एक निसर्गाचा जादूचा प्रयोगच आहे.'
लिलीचे हे सँडहोफ फार्म हे नामिबियाच्या दक्षिणेकडील दुर्गम शहर माल्टहोहेपासून ४० किलोमीटरवर आहे. हा अद्धभूत नजारा हा नामिबियाच्या वाळवंटाच्या अगदी काटावर आहे. हा ७०० हेक्टरचा मोठा प्रदेश सहसा कोरडा असतो. त्यावर भेगा पडलेल्या असतात. तिथं सूर्यकिरणांची तीव्रता खूप असते. त्यामुळं हा भाग जवळपास मृतच गणला जातो.
मात्र ज्यावेळी हंगामी पावसाची सुरूवात होते त्यावेळी या निर्जीव वाळवंटात जीव येतो. तिथं १५ ते ३० सेंटीमीटर उंच पाणी साचतं अन् त्या जमिनीतून लिलीचं निसर्गसौंदर्य उमलू लागतं. या लिलीच्या फुलांच्या उमलण्याचा वेग हा प्रचंड असतो. जवळपास एका रात्रीत ही फुलं उमलतात. जवळपास १० लाख फुलं एकाचवेळी उमलल्यानं या भागात गुलाबी अन् पांढऱ्या रंगाच्या लिलींचा जणू समुद्रच निर्माण होतो.
मात्र निसर्गाचा हा सोहळा फार कमी काळासाठी अनुभवता येतो. नामिबियाच्या प्रचंड उष्ण आणि रूक्ष वातावरणामुळं इथंल पाणी लगेच सुकतं आणि या फुलातील बीज जमिनीत सामावून जातात. हा संपूर्ण काळ हा फक्त ५ ते ८ दिवसांचाच असतो. ही फुले ज्यावेळी नाहीशी होणार असतात त्यावेळी त्यांचा रंग पाढऱ्यापासून गडद गुलाबी होत जातो. त्यानंतर ही फुले जवळपास पुढच्या वर्षापर्यंत जमिनीत सामावली जातात.