

SBI Probationary Officer salary
नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम करणारी एक प्रोबेशनरी ऑफिसर (PO) तिच्या महिन्याच्या पगाराबाबतची माहिती व्हिडिओद्वारे शेअर केली आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला असून, अवघ्या अडीच वर्षांच्या सेवेनंतर तिने सांगितलेल्या पगाराच्या आकड्याने काहींच्या भुवया उंचावल्या आहेत. तर काहींसाठी ही इन्स्पायरिंग स्टोरी ठरली आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे बँकिंग क्षेत्रातील पगारावर चर्चा सुरू झाली आहे. तसेच हा व्हिडिओ सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
संबंधित बँक कर्मचारी २०२२ मध्ये आयबीपीएस (IBPS) परीक्षा उत्तीर्ण होऊन बँकेत रुजू झाली होती. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, अडीच वर्षे पीओ म्हणून काम केल्यानंतर ५ वेतनवाढींचा समावेश आहे (दोन वार्षिक वेतनवाढ आणि JAIIB आणि CAIIB च्या तीन वेतनवाढी). तिला दरमहा मिळणाऱ्या ९५,००० रुपये पगाराव्यतिरिक्त १८,५०० रुपये 'लीझ रेंटल' आणि सुमारे ११,००० रुपये इतर भत्ते मिळतात. हे सर्व मिळून तिची एकूण मासिक कमाई १ लाख रुपयांच्या पुढे जाते.
बँकेतील या झपाट्याने झालेल्या पगारवाढीमागे तिने महत्त्वाची कारणे सांगितली आहेत. JAIIB (ज्युनियर असोसिएट ऑफ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स) आणि CAIIB (सर्टिफाइड असोसिएट ऑफ द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्स) यांसारख्या व्यावसायिक बँकिंग प्रमाणपत्रांचे महत्त्वही अधोरेखित केले आहे. अनेक बँका या परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त वेतनवाढ देतात.
सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्समध्ये दोन गट पडले आहेत. एका युजरने तिचे कौतुक करत म्हटले की, "हे तुमचे कष्ट आहेत. प्रत्येकाला वडिलोपार्जित संपत्ती मिळत नाही, तुमच्यासारखे लोक स्वतःच्या हिमतीवर उभे राहतात. प्रेरणा देत राहा." तर दुसऱ्या एका युजरने आश्चर्य व्यक्त करत विचारले, "माझा मित्रही पीओ आहे, पण तो नेहमी पगाराबाबत तक्रार करतो. पीओसाठी पगाराचे वेगवेगळे निकष असतात का?"यावर स्पष्टीकरण देताना त्या महिला अधिकाऱ्याने म्हटले आहे की, या पदाचा मूळ पगार ५६,००० रुपयांपासून सुरू होतो आणि अतिरिक्त वेतनवाढींमुळे माझा पगार या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. हा व्हिडिओ सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.