औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : दहावी-बारावीच्या परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनाच अधिक टेन्शन (Exam Stress) असते. त्या तणावातून पालक मुलांना सतत परीक्षेसंदर्भात विचारतात. पेपर कसा गेला?, किती गुणांचा सोडवला?, काय चुकलं, काय बरोबर आलं? यासारख्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांना पालकवर्ग त्रासून सोडतो. त्यातूनच मुले तणावात जातात आणि टोकाचं पाऊल उचलतात. त्यामुळे परीक्षेच्या काळात पालकांनी मुलांना समजून घेतले पाहिजे. त्यांचा तणाव हलका करणारी चर्चा केली पाहिजे, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ.मेराज कादरी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी आता परिक्षा कालावधीत नो टेन्शनची भुमिका घेणे आवश्यक आहे. पालकांनी परिक्षा आहे, अभ्यास कर, असा तगादा न लावता पाल्यांची प्रकृती उत्तम ठेवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी संतुलित आहार तसेच पुरेशी झोप याकडे लक्ष दिले पाहिजे. कमी झोप झाल्यानेही मुले तणावात जाऊ शकतात. त्यामुळे मुले टेन्शन फ्रि कसे राहतील, याकडे लक्ष दिले पाहिजे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे म्हणाले की, दहावी-बारावीच्या परीक्षा टर्निंग पॉइंट असतात. त्यामुळे विद्यार्थी अधिक चिंता करतात. अभ्यास केलेला असला तरी प्रत्यक्ष परीक्षेत त्यांचा गोंधळ उडतो. त्यात पालक आणखी भर घालतात. त्यामुळे पालकांनी या काळात मुलांना भावनिक आधार दिला पाहिजे. मुलांनी परीक्षेला गेल्यावर दीर्घ श्वास घेऊन सर्व आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पालकांनी मुलांना पेपरबाबत जास्त काही न विचारता त्यांना आधार दिला पाहिजे. तसेच, परीक्षेच्या काळात मुलांच्या चांगल्या गुणांचे कौतूक केले पाहिजे.
हेही वाचा :