पिंपरी : विजयासाठी नात्यागोत्याचा कल महत्वाचा | पुढारी

पिंपरी : विजयासाठी नात्यागोत्याचा कल महत्वाचा

मिलिंद कांबळे

पिंपरी : ग्रामपंचायत, नगर परिषद व पुढे पिंपरी-चिंचवड महापालिका झालेल्या या पिंपरी-चिंचवड उद्योनगरीत स्थानिकांचे वर्चस्व अद्याप टिकून आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत पक्षापेक्षा उमेदवारांचे नातेगोते, गावकी-भावकी, पाहुणे मंडळी यांचा प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरतो. चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतही नात्यागोत्यांचा कल विजयासाठी प्रभावी ठरणार आहे. ती एकगठ्ठा मते आपल्याकडे खेचण्यासाठी प्रमुख तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

शहरात सर्वत्र टोलेजंग इमारती उभ्या राहत असून, नागरीवस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यासह देशभरातून नागरिक येथे राहण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे सर्वधर्मीय नागरिकांचे वास्तव्य वाढले आहे. शहरात चिंचवड मतदारसंघातील भाग मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. काँक्रीटचे रस्ते, पदपथ व सायकल ट्रॅक, शॉपिंग मॉल, चित्रपटगृह, नामांकित ब्रँडच्या दुकानांमुळे गावाचे रूप बदलून मॉडर्न झाले आहे. स्थानिकांचा प्रभाव, नातेगोते, गावकी-भावकी, स्थानिक अर्थकारण परिसरात वरचढ आहे. स्थानिकांनी विविध व्यवसाय व धंद्यावरील पकड कायम ठेवल्याने त्यांचा दबदबा कायम आहे.

पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय पक्षाचा थेट प्रभाव व हस्तक्षेप चालत नाही. नेतेमंडळीची शहराच्या राजकारणावर पकड असली तरी, स्थानिकांचा सहाय्याशिवाय ती घट्ट होऊ शकत नाही. ग्रामस्थ मंडळी गावकी-भावकीच्या राजकारणात अग्रेसर आहेत. स्थानिकांचा प्रभावामुळे मतांचे गोळाबेरीज विजयाचा मार्ग सुकर करते.

तसेच, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातून कामासाठी शहरात अनेक कुटुंब वसले आहेत. त्यांची दुसरी व तिसरी पिढी शहरात आहे. अनेक भागात स्थलांतर करून आलेल्या मंडळीची संख्या मोठी आहे. असे चित्र असले तरी, बाहेरून आलेली मंडळींना स्थानिक नेत्यांच्या आधार घेऊनच राजकारण करावे लागत असल्याचे चित्र आहे. तसेच, हिंजवडी आयटी पार्कमधील अभियंते वाकड, पिंपळे सौदागर, थेरगाव, पिंपळे निलख, रहाटणी या भागात मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यांचीही मतेही निर्णायक असतील.

मतदारसंघातील राजकारणातील स्थानिक कुटुंब
जगताप, काटे, कलाटे, बारणे, गावडे, चिंचवडे, भोईर, कुटे, शितोळे, ढोरे, तापकीर, मानकर, वाल्हेकर, साठे, कामठे, भोंडवे, कस्पटे, कदम, नखाते, नढे, कोकणे, चोंधे, काळभोर, तरस, किवळे, काळे, खुडे, दर्शिले, भुजबळ, जवळकर.

पाठिंबा देण्याची जुनीच पद्धत
शेती, दुग्ध व्यवसाय, बैलगाडा असे रूप बदलून पिंपरी-चिंचवडमधील गावाचे स्वरूप शहरी झाले आहे. मात्र, बहुतांश ग्रामस्थ आपली शेती, बैलजोड, परंपरा तसेच, जोडधंदा अद्याप कायम ठेवून आहेत. निवडणुकीच्या वेळी तसेच, संकट समयी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. वादविवाद व भांडणे बाजूला सारून कट्टर वैरी एक होतात.

निश्चित केलेल्या उमेदवाराला संपूर्ण गावाचा एकमुखाने पाठिंबा दिला जातो. तो कोणत्या पक्षाचा, संघटनेचा, की अपक्ष याचा विचार केला जात नाही. गावाच्या एकीसमोर अनेकदा राजकीय गणिते फोल ठरतात. मतदारसंघात एकूण 19 प्रभाग आहेत. त्यात मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, वाल्हेकरवाडी, चिंचवड, काळेवाडी, थेरगाव, पुनावळे, वाकड, रहाटणी, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, सांगवी ही 15 गावे आहेत

Back to top button