

कोल्हापूरच्या सुनीता या शिक्षिका नेहमीप्रमाणे सायंकाळी शाळेतून घरी आल्या. चहा घेत असतानाच त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. सीबीआय ऑफिसर विक्रम बोलतोय, तुमच्या नावावर एक गंभीर प्रकरणात अटक वॉरंट निघाले आहे. ‘यू आर अंडर डिजिटल अरेस्ट.. तुम्हाला लगेच सेल्फ-कस्टडीमध्ये घ्यावे लागेल’, असे त्याने सांगितल्याने सुनीता यांचा श्वासच अडकला.
काय, पण मी काय केले, असे सुनीता यांनी घाबरतच विचारले. त्यावर त्याने सांगितले की, तुमच्या आधार कार्डाचा वापर करून ड्रग्जची आयात झाली आहे. ही गोष्ट अतिशय गंभीर आहे; पण एक मार्ग आहे. मी तुमचे नाव मुख्य यादीतून काढून घेऊ शकतो; पण तुम्हाला आम्हाला सहकार्य करावे लागेल. फोनवरील आवाज खूपच अधिकृत वाटत होता. तरीदेखील सुनीता यांनी विचारले, तुमचे ओळखपत्र काही आहे का? त्या अधिकार्याने क्षणातच व्हॉटस्अॅपवर आपले ‘सीबीआय’चे आयकार्ड, लोगो असलेले मेल व कॉल रेकॉर्ड पाठवले. त्यानंतर व्हिडीओ कॉल सुरू झाला. कॉलवर एक ऑफिस दिसत होते, पाठीमागे ‘सीबीआय’चा लोगो आणि पोलिस गणवेशातील माणसे दिसत होती.
‘तुम्ही आता कॅमेरा चालू ठेवा. कोणीही बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क साधायचा नाही. आम्ही तुमचे सहकार्य पाहून केस बंद करण्याचा विचार करू,’ असे त्याने सांगितले. सुनीता हादरल्या होत्या. घाबरून गप्प झाल्या आणि त्यांच्या सांगण्यानुसार फोनवर राहिल्या. नंतर त्यांना सांगण्यात आले, आता एक ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ भरावे लागेल. ते रिफंडेबल आहे.
एकदा ही केस क्लीअर झाली की, ती रक्कम परत दिली जाईल. सुरुवातीला 10 हजार, मग 25 हजार असे करत थोड्या वेळात सुनीता यांनी जवळपास लाख रुपये ट्रान्स्फर केले; पण नंतर फोन कट झाला आणि कुठलाही ‘सीबीआयमधील विक्रम’ पुन्हा कधीच संपर्कात आला नाही.
1. संबंधित व्यक्तीला त्याच्याच माहितीच्या आधारे कायदेशीर कारवाईच्या भीती घातली जाते.
2. बनावट ओळखपत्र, ऑफिस बॅकग्राऊंड व पोलिस गणवेश वापरून जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो.
3. खोटीनाटी कलमे सांगून संबंधित व्यक्तीला इतरांशी संपर्क न करता ‘सेल्फ-कस्टडी’मध्ये ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.
4. एकदा का समोरची व्यक्ती घाबरली की, तिचा विश्वास या सार्या गोष्टीवर बसल्यानंतर पैसे उकळण्याचे काम सुरू होते.
* घाबरून कोणताही निर्णय घेऊ नका, कोणत्याही धमकीचा सामना शांत राहून करा, कोणतेही सरकारी अधिकारी कोणालाही डिजिटल अरेस्ट करू शकत नाहीत. कारण, असा कोणताही प्रकार नाही.
* कोणतीही रक्कम कोणी फोनवरून धमकी दिल्यानंतर ट्रान्स्फर करू नका. सरकारी संस्था थेट पैशाची मागणी करत नाहीत.
* व्हिडीओ कॉल व अधिकृत बॅकग्राऊंडस्वर विश्वास ठेवू नका. हे सहजपणे बनावट करता येते.