

कुरुंदवाड : पत्नीच्या वादातून सुरू असलेल्या मध्यस्थीवेळी वाद विकोपास जाऊन हाणामारी झाल्याची घटना शिरढोण (ता. शिरोळ) येथे घडली. या हाणामारीत विवाहितेचा भाऊ उमरफारूख इस्माईल मुजावर (वय 29, रा. शिरढोण) यांच्या डोक्यात वीट घालून गंभीर जखमी करण्यात आले.
त्यांच्यावर सध्या मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात तौफिक इक्बाल मुल्ला (रा. शहापूर, ता. हातकणंगले), अमन आयुब शेख, टिपू आयुब शेख व आयुब हसन शेख (सर्व रा. टाकवडे, ता. शिरोळ) यांच्यासह इतर 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) सकाळी सुमारे 10.30 वाजता घडली.
उमरफारूख यांची बहीण वैवाहिक वादामुळे माहेरी आली होती. तिचा पती परत नेण्यासाठी शिरढोण येथे आला होता. दोन्ही कुटुंबीयांमध्ये मध्यस्थी सुरू असताना वाद वाढला आणि हाणामारीत रूपांतर झाले. संशयितांनी उमरफारूख यांच्यासह त्यांच्या आई व बहिणीला शिवीगाळ करत मारहाण केली. दरम्यान, टिपू शेख याने दारात पडलेली वीट उचलून उमरफारूख यांच्या डोक्यात घालून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.