पुणे : पुणे सायबर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय 28, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) हा सरपंच पती असल्याचे समोर आले आहे. त्याची पत्नी कोकबन गावची सरपंच असून, त्याचे वडील देखील एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे. त्यांचा बांधकाम व्यवसाय देखील आहे. तुषार याचे वडील हरिश्चंद्र यांचा देखील या गुन्ह्यात सहभाग असून, अद्याप ते फरार आहेत.
पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत पुण्यातील एका ज्येष्ठाला सहा कोटी 29 लाखांचा सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. या प्रकरणी, ज्येष्ठाने दिलेल्या तक्रारीनुसार शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करत असताना, सायबर पोलिसांना ज्येष्ठाच्या बँक खात्यातील पैसे 20 लाख रुपये तुषार याच्या बँक खात्यात म्हणजेच, श्री धावीर कन्ट्रक्शन या खात्यावर गेल्याचे दिसून आले. 11 नोव्हेंबर 2024 मध्ये हे पैसे ट्रान्स्फर झाले आहेत. तुषार याने 90 लाख आणि 20 लाख रुपयांची एफडी केली. त्यावेळी आरोपी हे बांधकाम व्यावसायिक असल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहचले. मात्र, आरोपी साथीदारासह तिथून पसार झाला होता.
पोलिसांनी त्याच्या घरी धडक मारली. त्यावेळी त्यांनी ते दोघे दोन अडीच महिन्यापासून येथे आले नसल्याची माहिती दिली. पोलिसांनी खबर्याचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे शेवटी तुषार याची माहिती मिळवली. तो पनवेल येथील एका फार्म हाऊसवर लपला होता. पोलिसांनी त्याला कामगाराच्या खोलीतून पकडले. आरोपींच्या बँक खात्यावर कोट्यावधी रुपये आले असल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले आहे.
तुषार हा सध्या सायबर पोलिसांच्या कोठडीत आहे. आरोपीविरुद्ध केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांत ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर एकूण पाच तक्रारी आहेत. या पाच गुन्ह्यांत वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.