जागतिक तापमान वाढीमध्ये होऊ शकते घट | पुढारी

जागतिक तापमान वाढीमध्ये होऊ शकते घट

ग्लासगो : जागतिक तापमान वाढीशी झुंजत असलेल्या जगासाठी एक खुशखबर आली आहे. संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषदेसाठी तयार केलेल्या खबरदारीच्या उपायांमुळे भविष्यात जागतिक तापमान वाढीचे गंभीर दुष्परिणाम कमी होऊ शकतात. दोन नव्या प्रारंभिक विश्लेषणांमधून ही बाब समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिकांच्या रिपोर्टमधून भविष्यातील हे आशादायक चित्र दिसून आले. संशोधकांचे म्हणणे आहे की जर सर्व काही सुरळीत पार पडले तर नुकत्याच उचललेल्या पावलांमुळे ऑक्टोबरच्या मध्यास केलेल्या अनुमानापेक्षा 0.3 ते 0.5 अंश फॅरेनहाईट तापमान कमी होऊ शकते.

विश्लेषणांमध्ये पूर्व औद्योगिक काळानंतर 2.1 अंश सेल्सिअस तापमानाऐवजी 1.8 किंवा 1.9 अंश सेल्सिअस तापमानाचे अनुमान नोंदवण्यात आले आहे. अर्थात दोन्ही विश्लेषणांमध्ये जग 1.5 अंश सेल्सिअस तापमानापासून दूर आहे ज्याचे लक्ष्य 2015 च्या पॅरिस करारात ठरवण्यात आले होते.

पृथ्वी आधीच 1.1 अंश सेल्सिअसने अधिक उष्ण झाली आहे. मेलबोर्न विद्यापीठाचे हवामानविषयक वैज्ञानिक माल्टे मेनशॉसेन यांनी सांगितले की आपले भविष्य आता थोडे आणखी सकारात्मक झाले आहे.

Back to top button