करडई पिकाची करा लागवड, पेरणीच्या वेळी काय काळजी घ्यावी?

KARDAI 1
KARDAI 1
Published on
Updated on

सध्या सुरू असलेल्या हंगामात करडई (Safflower) पीक घेतले जाते. करडई मध्ये आता सुधारित वाणे आली आहेत. आपल्या जमिनीचा पोत लक्षात घेऊन वाणाची निवड करणे आवश्यक आहे. पेरणीच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेतली तर करडईचे (Safflower) उत्तम पीक येते. पीक लागवड योग्य पद्धतीने केली तर त्यापासून शेतकर्‍यांना चांगला फायदा मिळू शकतो. करडई उत्पादकाने याचा विचार करणे आवश्यक आहे.

रब्बी हंगामात आपल्याकडे वेगवेगळी पीके घेतली जातात. हरभरा, जवस, बटाटा अशा पिकांची त्यामध्ये गणना होते. करडई हेही रब्बी हंगामात घेता येणारे उत्तम पीक आहे. करडई तेलाचा वापर आपल्याकडे केला जातो. त्यामुळे करडईला नेहमीच मागणी असते. करडईचे (Safflower) उत्पन्न आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. इतर पिकांप्रमाणेच करडईच्या उत्पन्नामुळे शेतकर्‍यांनाही चांगला फायदा होेतो. तथापि, करडईची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अशी काळजी न घेतल्यास हे पीक वाया जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळेच शेतकर्‍यांनी करडईच्या उत्पन्नाबाबत अधिक माहिती घेणे आवश्यक आहे.
आपले राज्य करडईच्या (Safflower) उत्पन्नात अग्रेसर आहे. 1988-89 मध्ये भारतात करडई पिकाखालील क्षेत्र सुमारे 10.67 लाख हेक्टर होते. त्यामधून उत्पादनही चांगले मिळाले. त्यावेळी 4.5 लाख टन इतके उत्पादन आपल्याला मिळाले होते. आपल्या देशात करडईच्या पिकाचे क्षेत्र आणि उत्पन्नाच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. हे उत्पादन आणखी वाढावे यासाठी शेतकर्‍यांनी या उत्पादनाबाबत अधिक माहिती करून घेणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रात भुईमुगाच्या खालोखाल करडईचे पीक महत्त्वाचे असून, एकूण गळीत धान्याच्या क्षेत्रापैकी 26 टक्के क्षेत्र या पिकाखाली आहे. आपल्या राज्यात 1960-61 मध्ये करडई पिकाखालील क्षेत्र 3.26 लाख हेक्टर क्षेत्र होते. ते 1988-89 मध्ये 5.90 लाख हेक्टर झाले. यावरून करडई (Safflower) पिकाखालील क्षेत्र कशा पद्धतीने वाढत आहे हे लक्षात येते. करडई पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. करडईचे मूळ खोल जात असल्याने ते कमी ओलाव्यावर येऊ शकते आणि पाण्याचा ताण सहन करू शकते. उगवणीच्या वेळी जमिनीत भरपूर ओलावा असल्यास करडईचे पीक चांगले वाढते. औरंगाबाद, बुलडाणा, अकोला, जळगाव या जिल्ह्यांमध्ये ते सातत्याने घेतले जाते. इतर भागात ते आंतरपीक म्हणून घेतले जाते. खरीप हंगामात ज्वारी, भुईमूग, तीळ आणि इतर कडधान्याचे पीक घेतल्यानंतर रब्बी हंगामात ओलावा टिकवून ठेवणार्‍या मध्यम आणि भारी जमिनीत हे पीक घेता येते. कोरडवाहू गव्हाच्या पिकापेक्षा करडई पिकाची लागवड अधिक फायदेशीर ठरते. करडई पिकाखालील क्षेत्रात वाढ करणे जेवढे आवश्यक आहे तेवढेच दर हेक्टरी उत्पादन वाढविणे जरुरीचे आहे.

उत्पादन वाढीसाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा. यासाठी जमिनीची पूर्वमशागत योग्य प्रकारे करावी लागते. करडई पिकासाठी चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी आणि सामू 7.5 ते 8 असलेली जमीन योग्य असते. अशा जमिनीत करडईची (Safflower) लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळते. जमिनीची नांगरणी करून 10 ते 12 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रतिहेक्टरी द्यावे आणि 2 ते 3 कुळाच्या पाळ्या द्याव्यात. करडईमध्ये तारा आणि भीमा या सुधारित जाती आहेत. या सुधारित जातींचा वापर आपण लागवडीसाठी करायला हवा. तारा या जातीचे वाण 120 ते 125 दिवसांत तयार होते. धुळे, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला या भागांत हे पीक चांगले येते. भीमा या जातीचे वाण 125 ते 140 दिवसांत तयार होते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ या भागात हे पीक चांगले येते. वेळेवर पेरणी केल्यास पिकावर वेगवेगळे रोग पडत नाहीत आणि उत्पादन चांगले मिळते. करडईची पेरणी दुचाडी पाभरीने करावी. पीक 40 ते 45 दिवसांचे झाल्यावर त्याच्या फांद्या टणक होतात. साधारण 15 डिसेंबरपर्यंत तापमान कमी होते.

करडईची लागवड करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये करडईची लागवड करावी. एक नांगरट आणि कुळवाच्या दोन पाळ्या देऊन मशागत करावी. लागवड सरी वरंबा पद्धतीने वरंब्याच्या बगलेत दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. आणि दोन रोपांतील अंतर 20 सें.मी. राहील या पद्धतीने करावी. सुधारित वाणाचे एकरी 4 एकर बियाणे तर संकरित वाणाचे 2 किलो बियाणे पुरते. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम थायरम प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर एक लिटर पाण्यात 150 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करून द्रावण पूर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम अझाटोबॅक्टर आणि 250 ग्रॅम पी.एस.बी. मिसळून पेरणीपूर्वी अर्धा ते एक तास बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. ही प्रक्रिया सावलीतच करावी. पेरणीवेळी एकरी 35 किलो युरिया, 125 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 20 किलो म्युरेट ऑफ पोटॅश जमीन बियाण्यापासून 5 सें.मी. चर घेऊन द्यावे. त्यानंतर एका महिन्याने 35 किलो युरिया हे खत द्यावे. दुसर्‍या कुळवाच्या पाळीपूर्वी एकरी 3 टन शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीनंतर आणि उगवणीपूर्वी वाफशावर 1.6 ते 2.2 लिटर बासालीन हे तणनाशक हेक्टरी 600 ते 800 लिटर पाण्यातून द्यावे. भारी जमिनीत दोन ओळींतील अंतर 45 सें.मी. ठेवावे आणि दोन झाडांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्टरी झाडांची संख्या 77,000 ठेवावी.

ज्या शेतकर्‍यांना 45 सें.मी. अंतरावर पेरणी करणे शक्य नसेल अशा शेतकर्‍यांनी करडईची (Safflower) पेरणी 30 सें.मी. अंतराच्या पाभरीने किंवा दुशाने दोन जोड ओळींत 60 सें.मी. अंतर ठेवून पेरणी करावी. त्यामुळेसुद्धा उत्पन्नात वाढ होते. बागायती करडईची पेरणी ऑक्टोबर महिन्यात करावी. बागायतीसाठी दोन ओळींतील अंतर 60 सें.मी. आणि दोन झाडांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. दर हेक्टरी 10 ते 12 किलो बियाणे वापरावे. दर किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम भुकटी चोळावी. बियाणे 5 ते 6 सें.मी. खोलवर पेरावे. त्यापेक्षा अधिक खोलवर पेरणी करू नये. रासायनिक खतास करडई पीक उत्तम प्रतिसाद देते. म्हणून अवर्षणग्रस्त भागात जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास 50 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद जमिनीस द्यावे. ओलावा कमी असल्यास प्रतिहेक्टरी 25 किलो नत्र जमिनीत द्यावे. बागायती पिकास 60 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद द्यावे. त्यापैकी 30 किलो नत्र आणि 30 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी आणि उरलेले 30 किलो नत्र 30 ते 35 दिवसांनी पाणी देण्याच्या वेळी पेरून द्यावे. आंतरमशागत पेरणीनंतर 20 दिवसांनी किंवा उगवणीनंतर 10 दिवसांनी विरळणी करावी. पेरणीनंतर 15 दिवसांच्या अंतराने दोन कोळपण्या कराव्यात. करडई (Safflower) पिकाला पाणी कमी लागते. मध्यम ते भारी जमिनीत पेरणीच्यावेळी पुरेसा ओलावा असल्यास करडईला पाण्याची गरज लागत नाही. परंतु; पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पेरणीपूर्वी एक पाणी द्यावे. त्यामुळे उगवण चांगली होऊन पिकाच्या सुरुवातीच्या काळात लागणार्‍या ओलाव्याची गरज पूर्ण होते. अशा प्रकारे योग्य काळजी घेतली तर करडईचे पीक शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळवून देते.

हे ही वाचा :

व्हिडिओ पहा : उसावर भारी पडतेय पेरूची बाग

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news