हळद लागवड कशी करावी? | पुढारी

हळद लागवड कशी करावी?

विलास कदम

हळदीला बाजारात नेहमीच मागणी असते. हळद पिकच्या विविध जाती आहेत. आपल्याकडे पिकवल्या जाणार्‍या हळदीची निवड करून त्याची योग्य पद्धतीने लागवड करावी. या पिकावर काही रोग पडू शकतात. दैनंदिन व्यवहारात वापरल्या जाणार्‍या या हळदीच्या लागवडीपासून शेतकर्‍याला चांगला फायदा होऊ शकतो.

दैनंदिन आहारात हळदीचा उपयोग केला जातो. विविध मसाले बनवण्यासाठीही हळदीचा उपयोग होतो. सौंदर्यशास्त्रात आणि आरोग्यशास्त्रात हळदीला बरेच महत्त्व आहे. त्यामुळे हळदीला बाजारात नेहमीच चांगली मागणी असते. आपल्याकडे ग्रामीण भागात हे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आपल्या देशातील हळद उत्पादनापैकी 80 ते 90 टक्के हळद ही आपल्या देशातच वापरली जाते. हे पीक प्रामुख्याने सांगली,सातारा, कोल्हापूर, नांदेड, परभणी,चंद्रपूर या जिल्ह्यांत घेतले जाते. प्रामुख्याने हळदीची जात, हवामान, पाणी, जमीन, मजूर, खतांचा पुरवठा इत्यादी बाबींवर हळदीचे उत्पादन अवलंबून असते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर हे पीक घेतले जाते. अद्यापही हळद लागवडीचे क्षेत्र वाढवण्यास आपल्याला वाव आहे. काही प्रमाणात हळदीची निर्यातही होते.

हळद या पिकास उष्ण व कोरडे हवामान मानवते. या पिकास मध्यम, काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. नदीकाठच्या जमिनीत हळदीचे उत्पन्‍न भरपूर मिळते. भारी काळ्या, चिकण व क्षारयुक्‍त जमीन या पिकास योग्य नाही. हळदीच्या लागवडीसाठी शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हळद या पिकास सेंद्रिय खताचा पुरवठा केल्यास भरपूर उत्पादन मिळते. त्यासाठी 50 ते 80 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत टाकून चांगले मिसळावे. याशिवाय वरखते हेक्टरी 13 किलो नत्र, 60 किलो स्फुरद व 60 किलो पालाश द्यावे; मात्र नत्र हे तीन समान हप्त्यांत द्यावे. पहिला हप्ता 6 व्या आठवड्यात उगवण पूर्ण होताच आणि दुसरा हळदीचे पीक 2.5 ते 3 महिन्यांचे झाल्यानंतर खोदणी करतेवेळी द्यावा. हळद हे पीक जमिनीत वाढणारे असल्याने जमीन स्वच्छ ठेवावी. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी देण्यात यावे. रानाचा जास्त तुडवा होणार नाही, याची काळजी घ्यावी.

कीडलेल्या गड्ड्यांची निवड करू नये. लावणीपूर्वी बियाणास ऍगलाल किंवा पारायुक्‍त औषध 1 लिटर पाण्यात 4 ग्रॅम व बी. एच.सी. 50 टक्के पाण्यात मिसळणारी पावडर (4 ग्रॅम 1 लिटर पाण्यात) या द्रावणाची प्रक्रिया 10 मिनिटे लावणीपूर्व करावी. मर झालेली झाडे गड्ड्यांसहित काढून घ्यावी. 10 टक्के फोरेट हेक्टरी 20 किलो अथवा 10 टक्के बी.एच.सी.पावडर हेक्टरी 70 किलो झाडाच्या बुध्यांभोवती कंदमाशा दिसताच वापर करावा. पानाच्या पृष्ठभागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे 1 ते 2 सें.मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. असे होऊ नये म्हणून रोग दिसू लागताच डायथेन झेड 87 किंवा डायथेन एम 45 ची (2-3 ग्रॅम औषध 1 लिटर पाण्यात मिसळून) फवारणी करावी. पानाच्या वडीनुसार प्रतिहेक्टरी 500 ते 700 लिटर द्रावण लागते. करपा या प्रकारच्या रोगात लांबगोल तपकिरी ठिपके दिसतात व ठिपक्यात वर्तुळे दिसतात. यासाठी वरीलप्रमाणेच बुरशीनाशकाचे फवारे करावेत. हळद 8 ते 9 महिन्यांची झाल्यानंतर पाने पिवळी होण्यास सुरुवात होते व पाने जमिनीवर लोळतात. हा पाला एकत्र करावा. तो हळद शिजविण्यास उपयोगी पडतो. काढणीनंतर गोल किंवा जेठे गड्डे सावलीत ढीग करून तसेच साठवतात. 1 ते 1.5 महिन्याने गड्ड्यांंच्या मुळ्या पूर्णपणे कुजतात. कुजलेले गड्डे अलग करून नष्ट करावेत. नंतर निवडलेल्या गड्ड्यांची गोलाकार रास करून त्यावर पाला झाकून ते वारा खेळेल अशा जागी सावलीत साठवावेत. दर 15 दिवसांनी गड्डे हलवावेत.

काढणीनंतर हळकुंड 8-10 दिवस ढीग करून ठेवावीत. त्यामुळे हळकुंडात चिकटलेली माती पडते. हळदीला काहील चुलवणीवर ठेवून शिजवतात. काहिलीमध्ये हळद शिजवताना हळदीच्या वर 4-6 बोटे पाणी राहील असे ठेवावे. तळातील व वरच्या हळदीचा थर चांगला वाफारून निघतो. हळद शिजवण्यास 2.5 ते 3 तास लागतात. शिजलेली हळद घट्ट जमिनीवर अथवा फरशीवर पसरावी. हळद 7 ते 8 दिवस वाळवावी. शिजवलेल्या हळदीशी पाण्याचा संबंध आल्यास हळद काळी पडते. हळद थोडी असेल तर पायास पोती बांधून खडबडीत जमिनीवर ती घासावी. हळद जास्त असेल तर ती पॉलिशिंग ड्रममध्ये घालून पॉलिश करतात. पॉलिश करावयाची हळद पिंपात टाकून त्यात घर्षणासाठी लहान अणकुचीदार खडे टाकतात. नंतर पिंप गोलाकार फिरवितात. अत्याधुनिक तंत्रज्ञान, जाती यांचा अवलंब करण्याकरिता अनुदान देण्यात येते. हळदीची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी कमीत कमी 0.20 हेक्टरपासून 1 हेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येत असून एकूण खर्चाच्या 25 टक्के अथवा जास्तीत जास्त 4 हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येते. अशा प्रकारे वेगवेगळ्या जातींची हळद तयार करून ती बाजारात विकता येते. त्याला बाराही महिने मागणी असते. त्यामुळे शेतकर्‍याला चांगला फायदा होऊ शकतो.

Back to top button