Sapodilla : जपा चिकूच्या फळांना | पुढारी

Sapodilla : जपा चिकूच्या फळांना

चिकुच्या पिकाला बी पोखरणार्‍या अळीपासून धोका असतो. किडीची अळी फळाच्या ‘बी’मध्ये थेट प्रवेश करून आतील बीजदले पोखरून खाते. एका फळात एकच अळी आढळते. अळी फळाच्या (Sapodilla) गराला कोणत्याही प्रकारचे नुकसान करत नाही. ही कीड पतंग वर्गातील असून तिचे शास्त्रीय नाव ट्रायमॉलिटिस असे असून टॉरट्रीसीडी हे तिचे कूळ आहे.

या किडीचे पतंग आकाराने लहान असून त्याचे पुढील पंख पांढर्‍या रंगाचे असतात आणि त्यावर तपकिरी रंगाची नक्षी असते. मादी पतंग नर पतंगापेक्षा मोठा असून त्याचे पोट नर पतंगाच्या तुनलनेत जास्त फुगीर असते. मादी पतंग सुमारे 200 ते 270 अंडी 8 ते 10 आणे तयार झालेल्या फळावर प्रतिफळ 1 ते 2 या प्रमाणात घालते. अंडी अंडाकृती असून अतिशय चपटी असतात. नुकतीच घातलेली अंडी ही पारदर्शक असून अळी बाहेर पडण्याच्या स्थितीत फिकट तपकिरी होतात.

अंडी उबविण्याचा कालावधी 11 दिवसांपर्यंत आहे. या कालावधीतील हवेतील बाष्प हे महत्त्वाची भूमिका दाखवते. अंड्यातून नुकतीच बाहेर पडलेली अळी फिक्‍कट केशरी रंगाची असून डोके गर्द तपकिरी रंगाचे असते. तर पूर्ण वाढलेली अळी गर्द गुलाबी रंगाची असून 8 ते 9 मि.मी. लांब असते. अळीची संपूर्ण वाढ फळाच्या आतील बीमध्ये पूर्ण होते. पूर्ण वाढलेली अळी फळाला 2-3 मि.मी. व्यासाचे छिद्र पाडून बाहेर येते आणि आपल्या तोंडावाटे बाहेर टाकलेल्या चिकट धाग्याला लोंबकळत राहते. त्यानंतर ती झाडावरील कोवळ्या पानांवर किंवा झाडाखाली सुक्या पानांमध्ये कोषावस्थेत जाते.

Sapodilla : जपा चिकूच्या फळांना
Sapodilla : जपा चिकूच्या फळांना

कोष हा पानाची कडा दुमडून आत रेशमी आवरणात लपेटलेला असतो. कोष फिक्‍कट तपकिरी रंगाचा असतो. कोषावस्था 10-12 दिवस असते, संपूर्ण जीवनक्रम एक ते दीड महिन्यात पूर्ण होतो.

उपाय 

चिकू बागेतील पालापाचोळा व प्रादुर्भावित चिकूचे अवशेष जागोजागी छोटे ढीग करून जाळून टाकणे. चिकू बागेतील झाडाच्या खालची जमीन नांगरून उलटपालट करणे. चिकू झाडांची योग्य छाटणी करून बाग विरळ ठेवणे. बागेमध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. चिकूवरील बी पोखरणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्ट्रामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 1 मि.ली./लिटर किंवा प्रोफोनोफॉस 50 टक्के प्रवाही 1 मि.लि./लिटर किंवा लॅम्बडासिहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 1 मि.लि./लिटर या कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी पावसाळा संपताच करावी व त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने 3 फवारण्या कराव्यात. मात्र, कीटकनाशक निवडताना कोणतेही कीटकनाशक लगेचच्या फवारणीत परत वापरू नये.

– अनिल विद्याधर

Back to top button