Sunflower Farming : फायदेशीर सूर्यफूल शेती | पुढारी

Sunflower Farming : फायदेशीर सूर्यफूल शेती

फायदेशीर सूर्यफूल शेती

सूर्यफुलाच्या तेलामध्ये लिनोलिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्‍तातील कोलेस्ट्रॉल प्रमाणात राहते. त्यामुळे रक्‍तदाब आणि हृदयविकारावरही नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सूर्यफुलाच्या लागवडीचे अनेक फायदे आहेत. काही ठिकाणी उशिरा पावसाळा सुरू होतो. अशा प्रदेशात खरीप हंगामात भुईमुगाऐवजी सूर्यफूल घेणे फायद्याचे ठरते. (Sunflower Farming)

Sunflower Farming : 969 पासून सूर्यफुलाच्या लागवडीस सुरुवात

भारतात 1969 पासून सूर्यफुलाच्या लागवडीस सुरुवात झाली. मात्र, खर्‍या अर्थाने 1972-73 पासून सूर्यफुलाच्या लागवडीच्या प्रमाणात वाढ झाली. सूर्यफुलाचे तेल आरोग्यासाठीही फलदायी असते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे खरीब, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामांत हे पीक घेता येते. कमी कालावधीत वाढणार्‍या या पिकाची काढणीही सोपी असते. सूर्यफुलाच्या पिकाला सोशिक पीक म्हणून ओळखले जाते. प्राप्त परिस्थितीत जुळवून घेण्याची क्षमता त्यामध्ये असते. क्षारयुक्त जमिनीतही हे पीक जोमाने वाढू शकते.

तीनही हंगामांत हे पीक घेता येत असल्याने शेतकर्‍यांसाठी ते वरदानच म्हणता येईल. मात्र, 5 अंश सेल्सियसखाली आणि 40 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमान या पिकास हानिकारक ठरते. अतिदमट हवामानामुळे पिकावर कडका (रायझोक्टोनिया विल्ट) हा बुरशीजन्य रोग पडण्याची भीती असते. कोरडवाहू शेतीसाठी हे एक उपयुक्त पीक असले तरी सुमारे 200 ते 750 मिलिमीटर पाऊस असलेल्या प्रदेशात हे पीक घेता येते. सूर्यफुलाची लागवड मध्यम किंवा भारी जमिनीत करता येते. सामूचे प्रमाण 8.5 पर्यंत असलेल्या क्षाराच्या जमिनीतसुद्धा सूर्यफूल चांगले येऊ शकते. मात्र, आम्लाधारित किंवा पाणथळ जमिनीत हे पीक येऊ शकत नाही. पिकाच्या लागवडीसाठी जमीन चांगल्या निचर्‍याची आणि 30 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल असावी. फारच हलक्या जमिनीत चांगले उत्पादन येत नाही.

flower Farming www.pudhari.news
flower Farming

 

(Sunflower Farming) पिकामध्ये जरूरीप्रमाणे 1-2 वेळा नांगरट करावी आणि कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन तयार करावी. सूर्यफुलाची पेरणी सर्वसाधारणपणे पुरेशी ओल झाल्यावर करावी. खरीप हंगामात जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पेरणी करावी आणि रब्बी हंगामत ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात पेरणी करावी. उन्हाळी सूर्यफूल घ्यावयाचे असल्यास पेरणी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत करावी. सूर्यफुलाचे बी पक्‍व झाल्यानंतर 45 ते 50 दिवस सुप्तावस्थेत असते. त्यामुळे काढणीनंतर 45 ते 50 दिवसांपेक्षा जास्त काळ साठविलेले बियाणेच पेरणीकरिता वापरावे.

खरीप हंगामात भुईमुगाच्या चार ते सहा सर्‍यांनंतर सूर्यफुलाच्या दोन सर्‍या घेतल्यास आर्थिक लाभ जास्त होतो. पश्‍चिम महाराष्ट्रासाठी सूर्यफुलाच्या दोन सर्‍या व तुरीची एक सरी म्हणजेच 2:1 किंवा 4:2 हे प्रमाण घेतल्यास आर्थिक लाभ सलग सूर्यफुलापेक्षा जास्त होतो.
सूर्यफूल स्वपरागसिंचित नसल्यामुळे कृत्रिमरीत्या परागीकरण घडवून आणल्यास उत्पादनात भरघोस वाढ होते. त्यासाठी परपरागीकरण करणे फायद्याचे ठरते. पेरणीनंतर 45-60 दिवसांनी पीक फुलोर्‍यावर हाताला तलम कापड बांधून फुलांवरून हात फिरवावा. हे काम सकाळच्या वेळी एक दिवसाआड करावे. यामुळे परागीकरण होऊन दाणे चांगले भरतात आणि 15 ते 20 टक्के उत्पादन वाढते.

कोरडवाहू पिकास पाण्याची सोय असेल तर पीक फुलोर्‍यावर असताना आणि बी भरण्याच्या वेळी पाणी द्यावे. बागायती पिकास रोपावस्था, कळीच्या वाढीची अवस्था, फुले उमलण्याच्या व दाणे भरण्याच्या अस्थेत पाणी दिल्याने जास्त उत्पादन येते. वाजवीपेक्षा जास्त पाणी दिल्याने मर रोग उद्भवतो. रब्बी हंगामामध्ये पाण्याच्या चार पाळ्या व उन्हाळी हंगामात 8-10 पाण्याचा पाळ्या द्याव्यात.
पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी सूर्यफुलाचे सलग क्षेत्र असणे आवश्यक आहे. फुलाजवळील पाने पिवळी पडू लागली व फुलाच्या देठाच्या मागील घेर पिवळा पडू लागला म्हणजे पीक काढणीस तयार झाले असे समजावे. झाडावरील पक्व झालेली फुले कापून एकत्रित करावीत व वाळवावीत. जाळीवर घासून अथवा फुले मळणीयंत्रण वापरून किंवा ट्रॅक्टरने मळणी करावी. थ्रेशरमध्येसुद्धा चाळणी बदलून ज्वारीप्रमाणे बी वेगळे करता येते. सूर्यफुल हे उत्पादनाच्या दृष्टीनेही उत्तम पीक आहे. या पिकाचे खरीप हंगामात हेक्टरी सुमारे 8-10 क्‍विंटल व रब्बी, उन्हाळी हंगामात सुमारे 12-15 क्‍विंटल उत्पादन आरामात मिळू शकते.
– जगदीश काळे

Back to top button