मुंबईतील कमला इमारतीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू, १६ जण जखमी | पुढारी

मुंबईतील कमला इमारतीला भीषण आग; ६ जणांचा मृत्यू, १६ जण जखमी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

गवालिया टँक येथील नाना चौकात असलेल्या कमला इमारतीस आज (शनिवार) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत ६ रहिवाशांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय १६ रहिवाशी जखमी झाले असून, त्यांमध्ये तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गवालिया टँकमधील २० मजली इमारतीला भीषण आग लागल्याची माहिती सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मिळाली. घटनास्थळी पोहचल्यावर इमारतीच्या १८ व्या मजल्यावर आग असल्याचे कळाले. तात्काळ बचाव कार्य सुरु केले असून अग्निशमन दलाच्या एकूण १२ गाड्या आग विझवण्यासाठी काम करत आहेत.

दरम्यान, आगीची माहिती मिळाल्यानंतर महापौरांनीही दुर्घटनास्थळाला भेट दिली आहे. आगीत जखमी झालेल्या रुग्णांना काही खासगी रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यात ओकार्ड, मसिना व रिलायन्स या रुग्णालयांचा समावेश आहे. या रुग्णालयांची चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

जखमी रुग्णांवर जसलोक, भाटिया आणि नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये भाटिया रुग्णालयातील १२ रुग्णांची प्रकृती स्थिर असून तीन रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच चार रुग्णांना नायर रुग्णालयात हलवले असून त्यांमधील सातजणांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे पालिका प्रशासनकडून सांगण्यात आले.

Back to top button