पुणे ; दिनेश गुप्ता : संरक्षण दलात आतापर्यंत विदेशी शस्त्र, मिसाईलसह शस्त्र खरेदीवर प्रचंड खर्च होत होता. यावर उपाय म्हणून केंद्राने मेक इन इंडिया अभियान राबवून लष्करी शस्त्रात लागणारे तंत्र खासगी कंपन्यांना तयार करण्याचे आवाहन केले. (Army Day Special)
या आवाहनाला भारतीय उद्योजकांनी प्रतिसाद देत प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. याचाच परिणाम म्हणून स्वदेशी बनावटीची विशाल, विभव आणि प्रचंड अँटी टँक माईन लष्करात दाखल होणार आहे. याबरोबरच मिसाईलची चाचणीही घेण्यात आली आहे.
भारतीय लष्कर दिनाचे औचित्य साधून मेक इन इंडिया संकल्पना किती उपयोगी ठरली, याचा आढावा घेतला. तज्ज्ञांच्या मते, भारतीय उद्योजकांनी स्वदेशी तंत्र विकसित करून लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी पुढाकार घेतला.
पुणे, बेंगळूर, मुंबई, गुजरातसह देशभरातील इतर कंपन्यांनी रणगाडा, मिसाईल, रॉकेट लॉन्चरबरोबर सीमेवरील जवानांच्या सुरक्षेसाठी जॅकेटस् तयार करून दिले आहे. लष्कराच्या अँटी टँक माईनमध्ये पहिल्यांदाच 'ट्रान्स्फार्मर रिसिवर सॉफ्टवेअर' बसवण्यात आले आहे.
अशाच प्रकारचे 80 किलोमीटरपर्यंत हल्ला करता येऊ शकेल, असे गाईडेड पिनाका रॉकेट व बिनाका मल्टिबॅरल रॉकेट लाँचर आता लष्कराकडून उत्पादित करण्यात येणार आहे. भारतीयांसाठी ही अभिनंदनाची बाब आहे.
लष्कराचे बळ वाढवतील, अशा योजना संरक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे शस्त्र खरेदीवर मोठ्या प्रमाणात खर्च होणारा पैसा विदेशात जाण्यापेक्षा भारतातच राहणार आहे.