महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीची विक्रमी उत्पादनाकडे घोडदौड! | पुढारी

महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीची विक्रमी उत्पादनाकडे घोडदौड!

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : उसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि दर हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याने चालू हंगामात महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीची साखर उत्पादनाच्या विक्रमाकडे वाटचाल सुरू आहे. यंदाच्या हंगामात राज्यात 125 लाख मेट्रिक टन साखर उत्पादन नोंदविले जाईल, अशी अपेक्षा आहे. शिवाय, चालू हंगाम महाराष्ट्रातील इथेनॉल उत्पादनातही आजवरचा विक्रमी हंगाम असेल, असे मत पश्चिम भारतीय साखर कारखानदार संघटनेचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केले.

साखर उत्पादन, इथेनॉल निर्मिती याबरोबरच चालू हंगाम साखरेच्या निर्यातीच्या द़ृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. या निर्यात वर्षामध्ये सुमारे 35 लाख मेट्रिक टन साखर निर्यात होईल, अशी स्थिती आहे, असे ठोंबरे यावेळी म्हणाले.

राज्यात यंदा उसाच्या लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे. सुमारे 12 लाख हेक्टर क्षेत्रावर उसाचे पीक गाळपासाठी सज्ज आहे. हे क्षेत्र आजवरच्या लागवड क्षेत्रामध्ये अधिक आहे. शिवाय राज्यातील आजवर नोंदविले जाणारे दर हेक्टरी सरासरी 80 ते 82 टन उत्पादन चालू वर्षी 90 ते 95 टनाच्या घरात गेले आहे.

याचा परिणाम म्हणून हंगामात गाळपासाठी 10 कोटी 80 लाख टन ऊस उपलब्ध होता. या उसापासून 125 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित होईल, अशी अपेक्षा आहे. या उत्पादनापैकी 15 लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाईल. त्याद्वारे 120 कोटी लिटर्स इथेनॉल निर्मिती होईल. इथेनॉल निर्मितीचा हा आकडाही राज्यात उच्चांकी असणार आहे.

राज्यात यंदा साखरेच्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी 47 लाख मेट्रिक टन साखरेचा शिल्लक साठा (ओपनिंग स्टॉक) होता. हा साठा देशातील एकूण शिल्लक साठ्याच्या (90 लाख टन) 50 टक्क्यांहून अधिक होता. यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीकडे वळविलेली 15 लाख मेट्रिक टन साखर वगळली, तर 110 लाख मेट्रिक टन साखर विक्रीसाठी उपलब्ध राहते.

नव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीपर्यंत त्यातील 100 लाख मेट्रिक टन साखर देशांतर्गत वापरासाठी खर्ची पडणार आहे आणि सध्या 25 लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचे करार पूर्णही झाले आहेत. अपेक्षित 35 लाख मेट्रिक टन साखर निर्यात यशस्वी झाली, तर अवघी 22 ते 25 लाख मेट्रिक टन साखर नव्या हंगामापूर्वी शिल्लक राहते. हा अल्पशिल्लक साठा नव्या हंगामाच्या अर्थकारणावरील ताण कमी करणारा असेल. शिवाय, आगामी साखर वर्ष उत्पादकांसाठी गोड बातमी देण्याचे संकेत मिळताहेत.

Back to top button