

तमिळ सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता ‘मक्कल सेल्वन’ विजय सेतुपती गेला आठवडाभर सिनेरसिकांच्या चर्चावर्तुळात आपलं एक स्थान राखून आहे. याचं कारण म्हणजे नेटफ्लिक्सवर रिलिज झालेला त्याचा ‘महाराजा’ हा नवा सिनेमा. ‘महाराजा’ हा विजयचा 50 वा सिनेमा. मक्कल सेल्वन म्हणजे जनतेचा खजिना. तमिळ मक्कल सेल्वन ते भारताचा ‘महाराजा’ हा विजय सेतुपतीचा प्रवास मनोरंजक आहे.
नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी रिलिज झालेला ‘महाराजा’ हा नवा सिनेमा सध्या सिनेरसिकांच्या चर्चेचा विषय आहे. या चर्चेचं केंद्रस्थान अर्थातच सिनेमात शीर्ष भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच विजय सेतुपती आहे. त्याच्या इतर अनेक सिनेमांसारखाच ‘महाराजा’ही दर्जेदारच आहे. या सिनेमात बॉलीवूडचा प्रथितयश दिग्दर्शक अनुराग कश्यपही तगड्या भूमिकेत आहे. त्याचंही कौतुक होतंय. पण विजयचं पारडं नेहमीप्रमाणे इथंही जडच आहे. विजयचा हा 50 वा सिनेमा. एकीकडे शेकडो लोकप्रिय सिनेमांमध्ये उत्तम काम करूनही एकाच इंडस्ट्रीची ओळख बनलेले कलाकार आहेत; तर दुसरीकडे एकाच सिनेमातून रातोरात पॅन इंडिया स्टार व्हायचं भाग्य लाभलेले कलाकारही आहेत. पण आपली प्रादेशिक ओळख जपत पॅन इंडिया स्टार बनण्याचं कसब विजयसारख्या मोजक्याच कलाकारांना जमलंय. त्यामुळे विजयसारख्या एका इंडस्ट्री आऊटसायडरचा हा प्रवास निश्चित वाखाणण्याजोगा आहे.
तथाकथित ‘स्टार कल्चर’चा भाग म्हणून आपल्या आवडत्या सिनेकलाकारांना एखादी अनोखी पदवी देण्याची परंपरा भारतात पूर्वापार चालत आलीय. विशेषतः दक्षिणेकडच्या वेगवेगळ्या सिनेसृष्टींमध्ये भारतीयांच्या व्यक्तिपूजक स्वभावाचं अतिरेकी दर्शन घडून येतं. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या प्रमुख सिनेसृष्टींमध्ये व्यावसायिक सिनेजगतावर ‘स्टार कल्चर’चं वर्चस्व आहे. अगदी पिकल्या पानापासून ते नवख्या कलाकारांनाही या कल्चरचा भाग बनवलं जातं, बनावं लागतं.
आपल्या साधेपणासाठी ओळखला जाणारा विजय सेतुपतीही याला अपवाद नाही. त्याला तमिळ सिनेरसिक ‘मक्कल सेल्वन’ म्हणून ओळखतात. तमिळमध्ये ‘मक्कल’ म्हणजे लोक तर ‘सेल्वन’ म्हणजे खजिना किंवा संपत्ती. विजयने साकारलेल्या भूमिका या निम्न मध्यमवर्गीय स्तरातल्या तमिळ जनतेला आपलं प्रतिनिधित्व करणार्या वाटतात. त्यामुळे आपल्या अभिनयाच्या सामर्थ्याच्या जोरावर अल्पावधीतच लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या विजयला ‘मक्कल सेल्वन’ ही बिरुदावली खरोखरच शोभून दिसते.
घरच्या जबाबदारीमुळे तारुण्यातली ऐन उमेदीची काही वर्षं विजयने आखाती देशांत अकाऊंटंट म्हणून काम करताना खर्ची घातली. अभ्यासात फारसा रस नसलेल्या विजयने सुरुवातीच्या काळात संधी साधून ठिकठिकाणी ऑडिशन दिल्या होत्या. प्रख्यात दिग्दर्शक बाळू महेंद्र यांनी विजयला त्याचा चेहरा फोटोजेनिक असून त्याने अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्लाही दिला होता. पण सल्ला मिळणं आणि काम मिळणं यातला फरक विजय बराच काळ अनुभवत राहिला. दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराजच्या शॉर्टफिल्म्समध्ये विजयने काम केलं होतं. त्याचवेळी तो इतर सिनेमांमध्येही दुय्यम भूमिका साकारत होता. त्याचं प्रामाणिक काम बघून त्याला कार्तिकने ‘पिझ्झा’ या भयपटात संधी दिली. हा एक मेन्स्ट्रीम हिरो म्हणून विजयचा पहिला कमर्शियल सिनेमा होता. त्याआधी त्याने बर्याच गाजलेल्या सिनेमांमध्ये दुय्यम भूमिका साकारल्या होत्या. अगदी ‘तेन्मेर्कं पर्वंकाट्रं’सारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सिनेमातला त्याचा नायकही दुर्लक्षित राहिला होता. पण ‘पिझ्झा’मधून मात्र हा सर्वसामान्य वाटणारा डिलिव्हरी बॉय तमिळ जनतेच्या घरोघरी पोचला आणि तेव्हापासून जो त्यांच्या मनात विसावला तो कायमचाच. ‘पिझ्झा’नंतर एक मेन्स्ट्रीम अभिनेता म्हणून विजयच्या गाडीने पकडलेला वेग आजतागायत कायम आहे. हॉरर, कॉमेडी, थ्रिलर, अॅक्शन, ड्रामा असल्या कुठल्याही जॉनरमध्ये आणि तमिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड, हिंदी भाषेतल्या कुठल्याही सिनेमा, वेबसिरिज आणि टीव्ही शोमध्ये तो आता सहजगत्या वावरू शकतो.
सिनेस्टार म्हटलं की, साहजिकच गोरापान देखणा चेहरा, पिळदार शरीरयष्टी, शैलीदार वागणं-बोलणं, आकर्षक पेहराव अशी एक साचेबद्ध प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. निव्वळ या ‘वरलिया रंगा’ला भुलून कुणालाही स्टार समजणार्यांची अमाप गर्दी आपल्याकडे आहे. शेजारच्या कन्नड-तेलगू सिनेसृष्टीत हे ‘वरलिया रंगा’चं स्टार कल्चर फोफावत असतानाही ही प्रतिमा मोडणारे अनेक स्टार तमिळ आणि मल्याळम सिनेसृष्टीत जन्माला आले. विजयही त्यापैकीच एक. आपल्या घरासमोरच्या टपरीवर निवांत चहा प्यायला जावं अशा वेशभूषेत पडद्यावर आणि पडद्याआड वावरणारे अनेक कलाकार मल्याळम सिनेजगतात पाहायला मिळतात. तमिळ सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. मल्याळम सिनेसृष्टीच्या तुलनेत इथं स्टार कल्चरचा गवगवा जास्त असला, तरी त्यांची पडद्यावरची भूमिका आणि पडद्याआडची भूमिका ही अनेक राजकीय-सामाजिक कसोट्यांमधून सतत पडताळून पाहिली जाते. त्यातूनच जनसामान्यांशी ते आपुलकीने बांधले जात असतात.
विजय हा एरवी सुटाबुटात, भडक आणि आकर्षक पेहरावात वावरणारा नट नाही. त्याच्या थोराड शरीरयष्टीला शोभेलसा लांब बाह्यांचा, मळखाऊ रंगाचा शर्ट किंवा अगदीच साधा वाटेल असा टी शर्ट, कधी गुडघ्यापर्यंत गुंडाळलेली वेष्टी, कधी जीन्स किंवा कॉटन पँट तर कधी अघळपघळ लुंगी हा टिपिकल सामान्य तमिळ पुरुषांचा पेहराव विजय आपल्या सिनेमात मिरवताना दिसतो. त्यामुळे घरासाठी निरपेक्ष भावनेने झटणार्या कर्त्या पुरुषासारखं त्याच्याकडे पाहिलं जातं. अभिनयातील परकायाप्रवेश हा निव्वळ रंगभूषा-वेशभूषेइतपतच मर्यादित नसतो. त्या व्यक्तिरेखेची सांस्कृतिक-सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणंही अशावेळी तितकंच महत्त्वाचं असतं. इथं विजयची अभिनयक्षमता पणाला लागते. म्हणूनच ‘विक्रम वेदा’, ‘सुंदर पांडियन’, ‘विक्रम’, ‘मास्टर’, ‘उप्पेना’, ‘पेट्टा’, ‘जवान’मधलं त्याचं खलनायकी पात्र हे जितकं क्रूर आणि निष्ठूर आहे; तितकाच लोभस, भोळसट, प्रेमळ नायक आपल्याला ‘96’, ‘पिझ्झा’, ‘का पै रणसिंगम’, ‘काट्टूवागुलं रेंडं कादल’मध्ये दिसतो. ‘सुपर डीलक्स’, ‘कडइसी विवसायी’मधल्या हटक्या भूमिका असोत वा ‘ओरु नल्ला नाळ पात्तं सोलरीन’, ‘तुगलक दरबार’सारख्या विनोदी ढंगाच्या भूमिका असोत, विजयच्या अभिनयातलं वैविध्य जाणवत राहतं.
नुकताच आलेला विजयचा ‘महाराजा’ हा सिनेमा चांगलाच गाजतोय. सिनेमाचं टायटल हे विजयच्या अभिनयक्षेत्रातल्या कारकिर्दीला साजेसं वाटत असलं तरी त्याचं ‘मक्कल सेल्वन’ असणं हेच त्याचं खरं विशेषत्व आहे. ‘महाराजा’च्या पदवीआड येणारा अधिक भडक आणि झगमगीत ‘स्टार कल्चर’चा ऑरा हा त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी, विशेषतः वैविध्यपूर्ण पात्रनिवडीसाठी बाधक ठरू शकतो. त्यामुळे त्याने ‘मक्कल सेल्वन’ राहणं यातच त्याचं, त्याच्या चाहत्यांचं आणि तमाम सिनेरसिकांचं भलं आहे.