

निमिष वा. पाटगावकर
तमिळ लोकांची प्रादेशिक अस्मिता इतकी भक्कम आहे की, तिथे कुणी इतर भाषिक शिरकावच करू शकत नाहीत. याला अपवाद फक्त दोनच आहेत. एक म्हणजे रजनीकांत जो मूळचा शिवाजीराव गायकवाड आहे आणि दुसरा म्हणजे अर्थातच महेंद्रसिंग धोनी. या दोघांकरिता इथली जनता केवळ वेडी झालेली असते. इतकं अफाट प्रेम खचितच इतर कुणाला मिळते.
रजनीच्या चित्रपटाच्या प्रीमियरची आणि धोनी खेळत असतानाच्या चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याची तिकिटे मिळवायला तामिळीयन्स आपली इस्टेट खाली करून देतील. आता मात्र त्यांना चिंता फक्त रजनीचीच असेल कारण, जवळपास दोन दशकाच्या कारकिर्दीनंतर काल धोनीने आपले ग्लोव्हज कायमचे उतरवले आहेत. पंचेचाळिसाव्या वर्षी व्यावसायिक क्रिकेट खेळणे हे कठीणच असते. गेल्या मोसमात त्याने एकही सामना खेळला नाही तेव्हा ही बातमी आज ना उद्या येणार होतीच; पण तरी यापुढे एक खेळाडू म्हणून धोनीचे दर्शन नाही, हा धक्का निव्वळ सीएसकेच्याच नाही, तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना पचवावा लागेल.
आजकाल 'पर्व' हा शब्द सरार्स कशालाही वापरला जातो; पण धोनीच्या निवृत्तीने पर्व म्हणजे काय, याचा अर्थ समजायला सोपे होईल. धोनीची जडणघडण आणि वाटचाल चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचली; पण या चित्रपटात जो TRDO - टॅलेन्ट रिसर्च डेव्हलपमेंट ऑफिसर पद्धतीचा उल्लेख केला आहे, त्याने धोनी आणि २०११ चा विश्वचषक जिंकवून देणारी अनेक रत्ने मिळाली. भारतीय क्रिकेट हे अगदी नव्या सहस्रकाच्या सुरुवातीलाही प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद आणि बंगळूर या मोठ्या शहरांभोवतीच गुंफलेले होते. भारतासारख्या प्रचंड देशात जिथे क्रिकेट कानाकोपऱ्यात खेळले जाते, तिथे उत्तम गुणवत्ता असणारच होती; पण ती शोधायची काही सोय नव्हती. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे तेव्हाचे सल्लागार आणि ज्येष्ठ क्रीडा समीक्षक डॉ. मकरंद वायंगणकर यांनी कर्नाटकाच्या कानाकोपऱ्यातून गुणवान खेळाडू शोधून काढायला टॅलेंट रिसोर्सेस ऑफिसर्स पाठवले आणि त्यांनी हेरलेल्या या खेळाडूंनी कर्नाटक क्रिकेटचा कायापालट केला. भारतीय क्रिकेटच्या सुदैवाने तेव्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी क्रिकेट संघटनेची उत्तम जाण असणारे अध्यक्ष जगमोहन दालमिया होते. त्यांनी ही योजना देशव्यापी राबवायला सांगितले. भारतीय क्रिकेटची संघ निवड काही मोजक्या प्रादेशिक निवड समिती सदस्यांच्या कक्षेतून बाहेर पडून त्यांना या टॅलेंट रिसोर्सेस ऑफिसर्सची साथ मिळाली आणि रांची, मेरठ, गाजियाबाद अशा ठिकाणांतून नवनवे खेळाडू मिळाले.
धोनीचे महत्त्व प्रथम कळले ते २००७ च्या पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकात. भारताने ५ सप्टेंबर २००७ रोजी ओव्हलला इंग्लंडविरुद्ध कसोटी अनिर्णित राखून मालिका जिंकली. या आपल्या कसोटी संघातील एकदिवसीय क्रिकेटचे दिग्गज ११ सप्टेंबरपासून द. आफ्रिकेत सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या नव्या फॉरमॅटच्या ट्वेन्टी-ट्वेन्टी विश्वचषकात सामील होतील अशी अपेक्षा होती; पण तेंडुलकर, सेहवाग, गांगुली, द्रविड, लक्ष्मण गंभीर, झहीर यांनी ट्वेन्टी-ट्वेन्टीमध्ये स्वारस्य दाखवले नाही आणि धोनीच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ पडली. धोनी, युवराज, उथ्थपा इत्यादीं खेळाडूंनी इंग्लंडहून द. आफ्रिका गाठली. विश्वचषकाचा उर्वरित संघ भारताच्या विविध ठिकाणांहून निघून द. आफ्रिकेत दाखल झाला. अशा नव्या खेळाडूंची नव्या फॉरमॅटमध्ये मोट बांधून धोनीने संघ नुसता उभा केला नाही, तर विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले. इथपासून धोनी आणि ट्वेन्टी -ट्वेन्टीचे एक नाते जडले, ते एक खेळाडू म्हणून काल संपले.
मैदानावर कधीही संयम न सोडता बर्फाची लादी डोक्यावर घेऊन खेळणारा धोनी सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलने तर धोनीला चेन्नईत देव बनवले. मजेची गोष्ट अशी की, धोनी खेळत असला की, आयपीएलमधल्या प्रतिस्पर्धी संघाचे चाहतेही धोनीचा जयघोष करायचे. मध्यंतरी एका नव्या आयपीएलच्या चीफ मार्केटिंग ऑफिसरला भेटलो तेव्हा त्याने चाहत्यांच्या बाबतीत एक मजेशीर गोष्ट सांगितली. त्यांच्या संघाचा इतर कुणा संघाशी सामना असेल, तर बहुतांश प्रेक्षक संघाला पाठिंबा द्यायला त्यांच्या संघाची जर्सी घालतात; पण जेव्हा चेन्नईशी सामना असतो तेव्हा प्रेक्षकात फक्त पिवळा रंग दिसतो. धोनीला हे असे प्रेम त्याचा संघ, देश सोडून जगभर मिळाले.
धोनी कधीच कुठच्या माईलस्टोनसाठी खेळला नाही तर माईलस्टोन त्याच्यापाशी हात जोडून उभे राहिले. दोन विश्वचषक, पाच आयपीएल जिंकून देणाऱ्या धोनीचे पाय कायम जमिनीवर राहिले. आपण कुठून आलो आहोत याचा विसर त्याला कधीच पडला नाही. स्थितप्रज्ञ कसा असावा, याचे भगवद्गीतेतील वर्णन धोनीत बघायला मिळते. २०११ चा विश्वचषक जिंकल्यावर त्याच्या दृष्टीने स्पर्धा संपली होती. जेव्हा संपूर्ण भारतवर्ष विजयोत्सवात रात्र जागवत होता तेव्हा धोनी आपल्या हॉटेलच्या रूममध्ये केव्हाच पोहोचला होता. मैदानावर त्याच्या भावना फक्त दोनदाच दिसल्या. एकदा २०१९ च्या विश्वचषकात उपांत्य फेरीत तो धावबाद झाल्यावर आणि दुसऱ्यांना जडेजाने आयपीएल जिंकून दिल्यावर!
धोनीचे नेतृत्वगुण, विजेच्या चपळाईचे यष्टिरक्षण, डीआरएस घेण्याबाबतची जाण हे सर्व आपण जाणतोच; पण धोनी सर्वांना आपला का वाटतो, याचे उत्तर त्याच्या साधेपणात आहे. मला आठवतंय, २०१९ ला विश्वचषकात इंग्लडला एकदा सराव संपल्यानंतर तिथे प्रवेश मिळवलेले अनेक उत्साही चाहते होते. सर्वांना अर्थातच खेळाडूंबरोबर सेल्फी हवे होते. बाकीच्या खेळाडूंनी हुशारीने तिथून प्रस्थान केले; पण धोनी एक खुर्ची मांडून बसला आणि रांगेने यायला सांगून तिथे असलेल्या सगळ्यांना सेल्फी देऊनच तिथून गेला. त्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर बघितलेला आनंद मी आजही विसरू शकत नाही. पूर्वी रांची शहरात राहणारा धोनी आता रिंग रोडवर मोठ्या फार्म हाऊसमध्ये राहायला गेला. एकदा सर्व जगभर अंगावर तिरंगा रंगवून फिरणाऱ्या सुधीर गौतमला मी रांचीला सामन्याच्या वेळी कुठे राहतोस विचारले, तर त्याने शांतपणे 'माहीभाई के घर पे' असे उत्तर दिले. कुठचाही दिखावा न करता धोनीचे कर्तृत्व जितके मोठे आहे तितकेच मनही मोठे आहे.
खरं तर, रांची ते चेन्नई हे अंतर १७०० मैलाचे आहे; पण चेन्नईला, धोनीला जे प्रेम मिळते ते कदाचित रांचीपेक्षा जास्त असेल. तामिळ चित्रपट असो वा राजकारण ते नेहमीच जरा लाऊड असते. त्यांचा सुपरहिरो मग तो रजनीकांत असो वा धोनी, त्यांच्या एन्ट्रीपासून तो माहोल आपोआप तयार केला जातो. चेन्नईला धोनीची आयपीएल सामन्यात मैदानात जेव्हा एन्ट्री व्हायची तेव्हा रजनीपासून कमल हसनपर्यंतच्या अनेक हीरोच्या त्या त्या चित्रपटांतील एन्ट्रीचे गाणे डीजेवर वाजवले जायचे आणि प्रेक्षक बेभान व्हायचे. प्लास्टिकच्या पिवळ्या शिट्ट्या घेऊन त्यातून एक पेशकश सादर व्हायची. हे सगळे आजूबाजूला चाललेले असताना सिंहासारखी चाल (आणि एकेकाळी सिंहासारखे आयाळ पण असलेला) धोनी जणूकाही एखाद्या शांत जंगलात वनराज चालत येईल तसा यायचा. प्रेक्षकांचा उत्साह बघून चेंडूही वारंवार प्रेक्षकात जायचा हट्ट करायचा आणि धोनी आपल्या बॅटने तो पुरवायचा. चेंडूचे भाग्य असले, तर एखाददुसरी हेलिकॉप्टरची फेरीही घडायची.
सीएसकेने धोनी निवृत्त झाला, तरी पिवळ्या जर्सीत सुमपदेशक म्हणून दिसेल, हे जाहीर केल्याने धोनीचे दर्शन होईल; पण वनराजाचे दर्शन जे वनात होते त्याची मजा पिंजऱ्यातील सिंह बघून होत नाही. आता धोनीच्या बॅटच्या आणि ग्लोव्हजच्या करामती आठवून आनंद मानायचा. क्रिकेटच्या मैदानात निवड समितीने माळ घातली म्हणून कुणाला कर्णधारपदाचा मुकुट मिळतो. धोनीला तो अधिकृतपणे मिळालाच; पण हा चेन्नईच्या रयतेचा राजा होता. धोनीला 'थाला' म्हणजे लीडर, बॉस चेन्नईत म्हणतात. तामिळनाडूच्या इतिहासात कुठच्याही भडकपणाचा लवलेशही नसलेला हा एक एकमेव 'थाला' असेल. तामिळनाडूच्या जनतेने अनपेक्षित सत्तापालट करून दाखवला; पण हा सत्ताबद्दल त्यांना नको होता. चेन्नईचे प्रेक्षक अस्मितेचा मान राखून पिवळ्या जर्सीत मैदानात पुन्हा येतील; पण त्यांची नजर खेळपट्टीकडे न जाता डगआऊटकडेच असेल.