

ज्योतिष शास्त्रानुसार, शनी अस्त झाल्यामुळे त्यांच्या काही कठोर प्रभावांमध्ये घट होऊन जातकांना दिलासा मिळू शकतो.
Shani Asta 2026
मुंबई : ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. नवग्रहांमध्ये 'न्यायदेवता' मानले जाणारे शनिदेव लवकरच मीन राशीत अस्त होणार आहेत. १३ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या या बदलामुळे काही ठराविक राशींच्या जातकांना नोकरी आणि व्यवसायात शुभ फळ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वैदिक पंचांगानुसार, शनिदेव १३ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ७:१३ वाजता मीन राशीत अस्त होतील. साधारण ४० दिवसांच्या अस्त स्थितीनंतर, २२ एप्रिल २०२६ (बुधवार) रोजी पहाटे ४:४९ वाजता शनीचा पुन्हा उदय होईल. ज्योतिषीय मान्यतेनुसार, शनी अस्त झाल्यामुळे त्यांच्या काही कठोर प्रभावांमध्ये घट होऊन जातकांना दिलासा मिळू शकतो.
मेष राशीच्या जातकांसाठी शनीचा अस्त बाराव्या भावात होणार आहे. या राशीवर सध्या शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. शनी अस्त झाल्यामुळे साडेसातीचा त्रास कमी होऊ शकतो. अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल आणि आर्थिक घडी बसेल. दीर्घकाळापासून असलेल्या आरोग्य समस्यांपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरी किंवा व्यवसायाची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल.नोकरी करणाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी वादात पडू नये आणि गुप्त शत्रूंपासून सावध राहावे.
वृश्चिक राशीच्या पाचव्या भावात शनीचा अस्त होणार आहे. यामुळे रखडलेली अनेक कामे मार्गी लागतील. व्यापाऱ्यांना एखादा मोठा प्रकल्प किंवा नवीन 'डील' मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी हा काळ योग्य आहे. कार्यक्षेत्रात पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. संततीबाबत काही चिंता सतावू शकते. विद्यार्थ्यांनी शिक्षणात अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे.
कुंभ राशीच्या दुसऱ्या भावात शनीचा अस्त होणार आहे. या राशीवर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू असल्याने शनीचा अस्त शुभ ठरेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून चांगला नफा मिळू शकतो. वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील. केलेल्या कष्टाचे पूर्ण फळ या काळात मिळेल. शनीच्या अस्तमुळे स्वभावात किंवा बोलण्यात कठोरपणा येऊ शकतो. बोलताना संयम न ठेवल्यास बनते काम बिघडू शकते. तसेच कौटुंबिक मतभेद टाळण्याचा प्रयत्न करावा.
टीप: वरील ज्योतिषशास्त्रावरील माहिती ही इंटरनेट स्रोतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे, त्याचा परिणामही वेगवेगळा असू शकतो. महत्त्वपूर्ण निर्णयासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी कृपया तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या.