भारताचे पहिले यूपीआय एटीएम नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने 'हिताची पेमेंट सर्व्हिसेस'च्या मार्फत व्हाईट लेबल एटीएमच्या रूपाने नुकतेच लाँच करण्यात आले. सध्याचा डिजिटल इंडियाचा वेग पाहता यूपीआयच्या मदतीने एटीएममधून पैसे काढण्याच्या सुविधेमुळे डिजिटल इंडियाला आणखी मदत मिळणार आहे. एकप्रकारे सीमलेस कॅश विड्रॉलला आणखी बळकटी मिळणार आहे.
आता पैसे काढण्यासाठी एटीएम कार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही. क्यूआर कोडच्या मदतीने रक्कम काढता येणार आहे. यासंदर्भात 'एनपीसीआय'ने म्हटले की, आपण डेबिट कार्डशिवाय यूपीआयचा वापर करत रोख रक्कम काढू शकतो. या सुविधेचा ग्राहकांना फायदा मिळेल. गावात राहणार्या मंडळींना एटीएम कार्ड बाळगण्याची गरज भासणार नाही. यूपीआय विड्रॉलमुळे एटीएम विसरण्याची, हरविण्याची भीती देखील राहणार नाही.
यूपीआय-एटीएम सेवेला इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉलच्या (आयसीसीडब्लू) रूपातूनही ओळखले जाते. यात यूपीआयच्या मदतीने रोख रक्कम काढता येणार आहे. म्हणजेच पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डची आवश्यकता भासणार नाही. एखादा ग्राहक एटीएमवर यूपीआय कॅश विड्रॉलचा पर्याय निवडेल. त्यानंतर आवश्यक असणारी रक्कम नमूद करावी लागेल. त्यानंतर एटीएमच्या स्क्रिनवर क्यूआर कोड दिसेल. व्यवहार पूर्ण करण्यासाठी आणि रोकड काढण्यासाठी ग्राहकांना यूपीआय अॅपचा वापर करावा लागेल. अॅपच्या मदतीने क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर यूपीआयचा पिन टाकावा लागेल. या पिनची एटीएम मशिनकडून खातरजमा केली जाईल आणि पैसे एटीएममधून बाहेर येतील.
बँक ऑफ बडोदा या बँकेने आपल्या 6 हजार एटीएमवर यूपीआय एटीएम सुविधा सुरू केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCL) सहकार्याने यूपीआय एटीएम सेवा सुरू करणारी ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक असेल. या ठिकाणी ग्राहक एटीएमच्या डिस्प्ले स्क्रीनवर फक्त क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईल यूपीआयच्या मदतीनेडेबिट कार्डच्या मदतीशिवाय या 6 हजार एटीएममधून कुठूनही पैसे काढू शकतात. ही सुविधा इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याचे तंत्रज्ञान वापरते, जी सर्व सहभागी जारीकर्त्या बँकांच्या ग्राहकांना कोणतेही सुरक्षित व सक्षम यूपीआय मोबाईल अॅप वापरून एटीएममधून पैसे काढून देते. यूपीआय एटीएम सुविधा कार्ड न वापरता पैसे काढण्याचा एक सोयीस्कर आणि सुरक्षित मार्ग आहे. याद्वारे ग्राहकाला पैसे काढणे अधिक सुरक्षित आणि सोयीचे होणार आहे.
हेही वाचा :