Economic News : अर्थवार्ता | पुढारी

Economic News : अर्थवार्ता

– प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकामध्ये एकूण अनुक्रमे 384.65 अंक व 1211.75 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 19819.95 अंक व 66598.91 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 1.98 टक्क्यांची, तर सेन्सेक्समध्ये 1.85 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सर्वाधिक वाढ होणार्‍या कंपन्यांच्या समभागांमध्ये कोल इंडिया (19.1 टक्के), लार्सन अँड टुब्रो (7.4 टक्के), एचसीएल टेक (6.4 टक्के), भारत पेट्रोलियम (5.2 टक्के), एनटीपीसी (4.1 टक्के) यांचा समावेश झाला तर सर्वाधिक घट दर्शवणार्‍या समभागांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा (-1.5 टक्के), अ‍ॅक्सिस बँक (-1.1 टक्के), आयशर मोटर्स (-0.9 टक्के), एशियन पेंटस् (-0.7 टक्के) यांचा समावेश झाला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सातत्याने 5 आठवडे निर्देशांकांनी पडझड दर्शवल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही निर्देशांकांनी वाढ दर्शवण्यास सुरुवात केली. निफ्टीचा सर्वकालीन उच्चांक 19991.85 अंक (Life Time High) इतका असून त्यापासून निफ्टी आता केवळ सुमारे एक टक्का दूर आहे, तर सेन्सेक्स आपल्या सर्वकालीन उच्चांकापासून सुमारे 1 हजार अंक म्हणजेच सुमारे दीड टक्का दूर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात सकारात्मक वातावरण राहिल्यास येत्या आठवड्यात दोन्ही निर्देशांक पुन्हा नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची गुंतवणूकदारांना आशा आहे.

सौदी अरेबिया आणि रशिया या तेल उत्पादक देशांनी दरदिवशी एकूण एकत्रितपणे 13 लाख बॅरल्स उत्पादन कपातीचा निर्णय डिसेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या देशांची संघटना ओपेक प्लसच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे खनिज तेलाचे भाव मागील 9 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजे 90 डॉलर्स प्रतिबॅरलवर (ब्रेंटक्रुड) पोहोचले. तसेच अमेरिकेचे डब्ल्यूटीआय क्रुड 87 डॉलर प्रतिबॅरल स्तरावर पोहोचले. वर्षाअखेर हिवाळ्यामध्ये खनिज तेलाचे उत्पादन हिवाळ्यामुळे कमी होते. त्यामुळे सध्या कृत्रिमरीत्या उत्पादन कपात करून खनिज तेलाचे भाव चढे ठेवण्याचा ओपेक प्लस संघटनेच्या सदस्य देशांचा प्रयत्न आहे. मागील दोन सप्ताहांत खनिज तेलाचे भाव सुमारे 9 टक्क्यांनी वाढले आहेत. भारतासारख्या खनिज तेलाची आयात करणार्‍या देशाच्या अर्थव्यवस्थेसासाठी ही प्रतिकूल बाब आहे.

जगातील अग्रगण्य कंपनी एनव्हिडियाने रिलायन्स जिओ आणि टाटा समूहासोबत करार केला. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artifical Intelligence) आणि चिप डिझायनिंग क्षेत्रात अग्रगण्य असलेली एनव्हिडिया जिओ आणि टाटा समूहाचे मनुष्यबळ प्रशिक्षित करणार. टाटा समूहातील टीसीएस, टाटा कम्युनिकेशन्स आणि टाटा मोटर्समधील 6 लाख कर्मचार्‍यांना चॅट जीपीटीसारख्या कृत्रिम बुद्धिमत्तानिगडीत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार तसेच जिओ कंपनीच्या ग्राफिक प्रोसेसिंग आणि नेटवर्किंग या दूरसंचार व ब्राँडबँड कामांशी निगडीत तंत्रज्ञानाची ओळख होण्यास भारतामधील तंत्रज्ञांना मदत होईल.

इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी कंपनी एथरमध्ये हीरो मोटोकॉर्प व जीआयसी कंपनीची 900 कोटींची गुंतवणूक. यामध्ये हीरो मोटोकॉर्पने राईटस् इश्यूच्या माध्यमातून 550 कोटी, तर जीआयसी या सिंगापूरच्या गुंतवणूकदार कंपनीने 350 कोटी गुंतवणूक केली. हीरो मोटोकॉर्प हा एथर कंपनीतील 2016 पासूनचा प्रमुख गुंतवणूकदार असून हीरो मोटोकॉर्पने आतापर्यंत एथरमध्ये 917 कोटींची गुंतवणूक केली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सेमीकंडक्टर चिप बनवणारी तैवानची फॉक्सकॉन कंपनी एसटी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स या दुसर्‍या इटालियन कंपनीसोबत भागीदारीमध्ये भारतात प्रकल्प उभारणार. 40 नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित चीप बनवल्या जाणार असल्याचे या कंपनीने स्पष्ट केले. यापूर्वी फॉक्सकॉनने भारतीय कंपनी वदांता सोबत करार केला होता. परंतु, काही कारणाने ही भागीदारी संपुष्टात आली. लवकरच फॉक्सकॉन भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर सरकारच्या कर विभागाची करडी नजर. बंगलोरस्थित गेम्स क्राफ्ट कंपनीकडे सरकारने 21 हजार कोटींच्या जीएसटीची मागणीची नोटीस पाठवली होती. परंतु, याविरोधात कंपनी कर्नाटक उच्च न्यायालयात गेली. कर्नाटक उच्च न्यायालयाने गेम्स क्राफ्ट कंपनीच्या बाजूने निर्णय दिला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. 2017 ते 30 जून 2022 दरम्यान गेम्स क्राफ्टद्वारे 77 हजार कोटींचे व्यवहार झाले. याबद्दल जीएसटी विभागाने 21 हजार कोटींचा जीएसटी सरकारजमा करण्याची नोटीस पाठवली होती.
पिरामल एंटरप्राईझेसची उपकंपनी इंडिया रिसर्जन्स फंड आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार उद्योग समूह बेन कॅपीटल यांनी एकत्रितपणे औषध घटक उत्पादन क्षेत्रातील कंपनी इंडस्विफ्ट लॅबोरेटरीज 1650 कोटींना विकत घेतली. सध्या इंड स्विफ्ट लॅबचा महसूल 1207 कोटींचा असून नफा 256 कोटी आहे.

चिनी सरकारने चीनमधील सरकारी कर्मचार्‍यांना अ‍ॅपल कंपनीचे फोन वापरण्यास मनाई केली. यामुळे अ‍ॅपल फोनची चीनमधील विक्री सुमारे 5 टक्क्यांनी घटू शकते. चीन अ‍ॅपल कंपनीची जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असून एकूण जगातील विक्रीच्या 18 टक्के महसूल म्हणजेच 394 अब्ज डॉलर्सचा महसूल अ‍ॅपल कंपनीला चीनमधून मिळतो. याची घोषणा होताच केवळ दोनच दिवसांत अ‍ॅपल कंपनीचे भांडवल बाजारमूल्य तब्बल 212 अब्ज डॉलर्सनी खाली आले. अ‍ॅपल कंपनीचा समभाग आठवड्यात सुमारे 7 टक्के खाली आला. सध्या चीन सरकारने अमेरिकन कंपन्यांवरील आपले अवलंबित्व कमी करण्याचे धोरण आखले आहे. स्थानिक व सेमीकंडक्टर चीप उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 40 अब्ज डॉलर्सच्या निधीची घोषणा केली आहे.

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रात स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोडा कंपनीचे पदार्पण. झिरोडा कंपनीने नझारा टेक्नॉलॉजीज या ऑनलाईन गेम बनवणार्‍या कंपनीमध्ये 100 कोटी गुंतवले.

वाढत्या खनिज तेलाच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय चलनत रुपयाने आजपर्यंतची सर्वाधिक कमकुवत पातळी 83.21 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंदभाव दिला. गुरुवारच्या सत्रात या कमकुवत स्तरावर बंदभाव दिल्यावर शुक्रवारी मात्र 82.9675 रुपये प्रतिडॉलर किमतीवर रुपया स्थिरावला. रिझर्व्ह बँकेने मोठ्या प्रमाणात बाजारात डॉलरची विक्री करून रुपया चलनाला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला.

भारतीय कंपनी ‘लार्सन अँड टुब्रो’ला सौदी आरान्को या सौदी अरेबियाच्या सर्वात मोठ्या खनिज तेल उत्पादक कंपनीकडून सुमारे 33260 (4 अब्ज डॉलर्स) कोटींची ऑर्डर मिळाली. L & T चा प्रकल्प उभारणी, व्यवसायाचा विस्तार आता आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढणार आहे. सौदी अरेबियाने नुकताच 110 अब्ज डॉलर्सचा अवाढव्य गॅस उत्पादन प्रकल्प जफुराह येथे उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अभियांत्रिकी आणि प्रकल्प उभारणी या कामातील काही भाग L & T कडे सोपवण्यात आला आहे. गतसप्ताहात ही बातमी येताच L & T चा समभाग सुमारे 7 टक्क्यांनी वाढून (वधारून) आजपर्यंतच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर (2900 रुपयांवर) स्थिरावला.

1 सप्टेंबरअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 4.04 अब्ज डॉलर्सनी वधारून पुन्हा 598.89 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

ऑगस्ट महिन्यात भारतात 31 लाख नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. भारतीय भांडवल बाजारातील डिमॅट खात्यांची संख्या 12 कोटी 66 लाखांवर गेली आहे. जानेवारी 2022 नंतरचा सर्वाधिक डिमॅट खाती उघडला जाण्याचा हा नवीन विक्रम आहे. भारतीय भांडवल बाजारात परदेशी गुंतवणूकदारांवरील अवलंबन कमी होऊन स्थानिक सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा सहभाग वाढत असल्याचे हे द्योतक आहे.

Back to top button