

Stock Market Today: मंगळवारी देशांतर्गत शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली. आज वीकली एक्सपायरी असल्याने सुरुवातीलाच व्यवहारात चांगली वाढ पाहायला मिळाली. सकाळी NIFTY 50 सुमारे 60 अंकांनी वधारत 25,900 च्या वर ट्रेड करत होता, तर BSE Sensex जवळपास 185 अंकांनी वाढून 85,240 च्या आसपास पोहोचला. बँक निफ्टी मात्र जवळपास सपाट राहिला.
आज आयटी क्षेत्रात दबाव दिसून आला. IT इंडेक्स आणि PSU बँकेचे शेअर्स घसरले होते. मात्र उर्वरित बहुतांश सेक्टर हिरव्या रंगात होते. कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि केमिकल क्षेत्रात सर्वाधिक तेजी होती. त्याचबरोबर मीडिया, फार्मा आणि हेल्थकेअर शेअर्समध्येही खरेदी झाली.
आज भारतीय बाजाराला जागतिक संकेतांचा मोठा आधार मिळाला. अमेरिकेत टेक शेअर्समुळे सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसली. वॉल स्ट्रीटवर डाओ आणि नॅस्डॅक दोन्ही निर्देशांक तेजीसह बंद झाले. याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावरही झाला.
आशियाई बाजारांमधूनही चांगले संकेत मिळाले. जपानचा निक्केई निर्देशांक वाढीसह विक्रमी पातळीवर पोहोचला. GIFT निफ्टीही सुमारे 75 अंकांनी वधारलेला दिसत होता, त्यामुळे गुंतवणूकदारांचा मूड सकाळपासूनच सकारात्मक आहे.
कमोडिटी बाजारातही आज जोरदार हालचाल पाहायला मिळाली. देशांतर्गत बाजारात चांदी तब्बल 12 हजार रुपयांनी वाढून सुमारे 2.62 लाख रुपयांवर पोहोचली, तर सोने जवळपास 2,600 रुपयांनी वाढून 1.58 लाखांच्या पुढे गेलं.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं आणि चांदी तेजीत होते. दुसरीकडे, स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील घडामोडींनंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. ब्रेंट क्रूड जवळपास 3 टक्क्यांनी वाढून 70 डॉलरच्या आसपास ट्रेड होत होता.
बाजारासाठी दिलासादायक बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची (FII) खरेदी सुरू आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यांनी कॅश आणि फ्युचर्स मिळून सुमारे 3,460 कोटी रुपयांची खरेदी केली. देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनीही थोडी खरेदी केली.
आज Grasim, Apollo Hospitals, Eicher Motors आणि Titan यांचे निकाल येणार असल्याने या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचं लक्ष आहे. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये Britannia, Jubilant Food, Oil India, Samvardhana Motherson आणि Torrent Power यांचे निकालही बाजारासाठी ट्रिगर ठरू शकतात.
दरम्यान, M&M च्या जानेवारी उत्पादनात मोठी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. Fractal Analytics च्या IPO ला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला.