Swiggy Instamart Layoffs : फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या 'इन्स्टामार्ट' या जलद सामान पोहोचवणाऱ्या (क्विक-कॉमर्स) विभागातून किमान ३४० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार आहे. कंपनीच्या कामकाजात काही महत्त्वाचे बदल केले जात असून, पुढील काळात व्यवसायाची वाढ अधिक चांगल्या पद्धतीने करता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
एकीकडे जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता ('आर्टिफिशियल इंटेलिजन्स') वापर वाढत आहे. यामुळे विविध उद्योगांमधील रोजगाराचे स्वरूप बदलत आहे. अमेरिकेत आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एआयमुळे नोकऱ्या जाण्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, आता त्याचा परिणाम इतर क्षेत्रांतही दिसून येत आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'च्या रिपोर्टनुसार, स्विगी कंपनी पुढील टप्प्यातील वाढीसाठी स्वतःची पुनर्रचना करत आहे. यामध्ये 'जनरेटिव्ह एआय' (Gen AI), कामाच्या नवीन पद्धती आणि क्विक-कॉमर्स व्यवसायाच्या रचनेत होणारे बदल यांचा समावेश आहे.
या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते या पुनर्रचनेचा अर्थ असा नाही की कंपनी आपला व्यवसाय कमी करत आहे. कंपनी इन्स्टामार्ट स्टोअर्स, पुरवठा साखळी आणि फ्रंटलाइन टीम्समध्ये गुंतवणूक सुरूच ठेवणार आहे. क्विक-कॉमर्स कंपनी अनेक तिमाहींपासून खराब कामगिरी आणि वाढत्या नुकसानीचा सामना करत आहे. असे असूनही, कंपनी आपला विस्तार सुरूच ठेवत आहे. आर्थिक वर्ष २०२७ च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे 'ॲडजस्टेड ईबीआयटीडीए' (EBITDA) नुकसान ८९५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत हा नुकसानीचा आकडा ८४९ कोटी रुपये इतका होता. मागील तिमाहीच्या तुलनेतही हे नुकसान ११८ कोटी रुपयांनी वाढले आहे.
स्विगीच्या मते, 'कॉन्ट्रीब्युशन मार्जिन'वर दबाव येण्याचे कारण म्हणजे ग्राहक मिळवण्यासाठी केलेली मोठी गुंतवणूक, ग्राहकांना पुन्हा ऑर्डर देण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि प्लॅटफॉर्मवर निष्क्रिय असलेल्या वापरकर्त्यांना परत आणण्यासाठी केलेले प्रयत्न. या तिमाहीत इन्स्टामार्टने ६९ नवीन 'डार्क स्टोअर्स' सुरू केली आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, १३३ शहरांमध्ये कंपनीच्या स्टोअर्सचे एकूण जाळे १,२४० वर पोहोचले आहे.
'मिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार. स्विगीमधील नोकरकपातीचा परिणाम सपोर्ट आणि कॉर्पोरेट अशा दोन्ही भूमिकांमधील कर्मचाऱ्यांवर होईल. नवीन बदलाला सामोरे जावे लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैधानिक देयकांव्यतिरिक्त, सेवा समाप्तीसाठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच मे २०२७ पर्यंत वाढीव आरोग्य आणि वेलनेस लाभही मिळणार आहेत.
ब्लिंकइट, झेप्टो, फ्लिपकार्ट मिनिट्स आणि ॲमेझॉन नाऊ अशा 'क्विक-कॉमर्स' प्रतिस्पर्धकांकडून इन्स्टामार्टला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. कर्मचारी कपात कंपनीच्या नवीन सीईओ, नंदिता सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली झाली आहे. त्यांनी ३ ऑगस्ट रोजी अमितेश झा यांच्याकडून सीईओ पदाचा पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी सिन्हा मायंत्रा कंपनीच्या प्रमुख होत्या.
स्पर्धा तीव्र होत असताना, स्विगी आपल्या उत्पादन निवडीद्वारे इन्स्टामार्टला वेगळे स्थान देण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीच्या सप्टेंबर-तिमाहीच्या कमाईवरील भाष्यादरम्यान, सीईओ श्रीहर्ष माजेटी म्हणाले होते की, "केवळ उपलब्ध वस्तूंची संख्या वाढवण्याऐवजी उत्पादने काळजीपूर्वक निवडण्याला प्लॅटफॉर्म प्राधान्य देईल. उत्पादनांच्या विविधतेकडे केवळ संख्या वाढवण्यावर आमचा भर नाही तर आमचे ध्येय ग्राहकांना केवळ अधिक पर्याय देणे हे नसून, त्यांना अधिक चांगल्या प्रकारे खरेदी करण्यास सक्षम करणे हे आहे."
'द इकॉनॉमिक टाइम्स'नुसार, कंपनीने सप्टेंबर तिमाहीच्या निकालांसोबतच्या आपल्या भागधारक संदेशात म्हटले होते की, हे संक्रमण आर्थिक वर्ष २०२७ च्या तिसऱ्या तिमाहीच्या मध्यापासून सुरू होईल आणि पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन ते तीन तिमाही लागतील. या प्रस्तावित मॉडेलमुळे स्विगीला आपल्याकडील उत्पादने, त्यांची किंमत आणि उपलब्धता यावर अधिक नियंत्रण मिळण्याची अपेक्षा आहे.